गडचिरोली – राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री चालू करतांना दिलेला तर्क अतिशय चुकीचा आहे. त्यात शेतकर्यांचा कोणताही लाभ नाही. उलट किशोरवयीन मुले आणि महिला यांना मद्याच्या आहारी नेण्याचा हा प्रकार आहे. त्याचा समाजातून निषेध झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी दिली.
(सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स)
ते पुढे म्हणाले, ‘‘वाईन निर्मितीसाठी लागणारी फळे ही केवळ २-३ जिल्ह्यांत होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकर्यांना त्याचा लाभ होईल, हा तर्क खोटा आहे. यापासून मिळणार्या महसुलातील केवळ ५ टक्के रक्कम शेतकर्यांना, तर उर्वरित ९५ टक्के पैसा व्यापारी आणि सरकार यांना मिळणार आहे. हा फळांचा रस आहे, असाही तर्क दिला जात आहे. तसे असेल, तर सत्तेतील नेते स्वतःच्या नातवांना हा फळांचा रस पाजणार आहेत का ? हा केवळ फळांचा रस असेल, तर त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अनुमतीची आवश्यकता कशाला ?’’, असे प्रश्नही बंग यांनी उपस्थित केले.