परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म-जगतासंबंधीचे कार्य

आजपासून वाचा नवीन सदर . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिकत्व दर्शवणारे त्यांचे कार्य आणि वैशिष्ट्ये !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य हे ‘अलौकिक कार्य’ आहे. त्याचे अनेकविध पैलू असून त्याची व्याप्ती शब्दांच्या माध्यमातून स्पष्ट करून देणे अशक्यच आहे. त्यांचे कार्य आणि वैशिष्ट्ये यांच्या संदर्भातील २०० हून अधिक मोठे ग्रंथ होऊ शकतील, इतके लिखाण सनातनकडे संग्रही आहे. येणारा युद्धजन्य आपत्काळ बघता समाजापर्यंत हे लिखाण लवकरात लवकर पोचून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘अलौकिक कार्या’ची ओळख समाजाला व्हावी, यासाठी आजपासून प्रतिदिन ही लेखमाला चालू करत आहोत. लवकरच याविषयीचे ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. – संपादक

परात्पर गुरु डॉक्टरांची ध्यानस्थ मुद्रा

मानवाला सूक्ष्मासंबंधीच्या पैलूंची दृश्यस्वरूपात ओळख करून देणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘अध्यात्म हे खरे पहाता सूक्ष्मातील म्हणजे, स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील शास्त्र आहे. सर्वसामान्य व्यक्तीची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता नसल्याने तिला अध्यात्मातील सूक्ष्म-जगतासंबंधी काहीच ठाऊक नसते. सूक्ष्मासंबंधीच्या विविध पैलूंची ओळख प्रस्तुत लेखमालेतून होईल.

साधकांना सूक्ष्म-जगताकडे पहाण्याची अभिनव दृष्टी देणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः सूक्ष्मातील असंख्य प्रयोग आणि अभ्यास करून सूक्ष्मातील कळण्याचे तंत्र विकसित केले अन् पुढे ते साधकांनाही शिकवले. यामुळे आज सनातनच्या अनेक साधकांना सूक्ष्मातील अचूक जाणता येते आणि काही साधकांना अद्वितीय असे ईश्वरी ज्ञान सूक्ष्मातून ग्रहण करता येते.

त्यांची सूक्ष्मातील जाणण्याच्या संदर्भातील शिकवण, साधकांना त्यांनी कसे घडवले ? यासंदर्भातील त्यांचे कार्य या लेखमालेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.

या लेखात विविध विषयांच्या अनुषंगाने ‘सूक्ष्मातील जाणण्याची आवश्यकता’ याविषयीचे मार्गदर्शन येथे देत आहोत. – संकलक

१. सूक्ष्मातील जाणण्याचे महत्त्व सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार

१ अ. केवळ जिज्ञासेमुळे सूक्ष्म-जगताविषयीची नाविन्यपूर्ण ओळख जगाला करून देता येणे

‘स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’, तर पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांचा वापर न करता मिळालेले ज्ञान म्हणजे ‘सूक्ष्म ज्ञान’. अध्यात्म हे अधिकतर सूक्ष्मासंबंधीचे शास्त्र आहे. माझ्यातील जिज्ञासेमुळे मला सूक्ष्माविषयी जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली. यामुळे मी सूक्ष्मातील विविध प्रयोग करण्यास शिकलो. त्यामुळे माझा सूक्ष्म-जगताविषयी अभ्यास झाला. यातूनच पुढे सात्त्विक वेशभूषा, आहार, अलंकार, धार्मिक कृती इत्यादींचा व्यक्तीवर होणारा चांगला परिणाम आदी शेकडो विषयांच्या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी १२ सहस्र ५०० हून अधिक परीक्षणे आणि चित्रे अशा नाविन्यपूर्ण गोष्टी मानवजातीला उपलब्ध करून देता आल्या.’ (२४.११.२०१८)

१ आ. कुठे पाश्चात्त्यांची वेळकाढू संशोधनपद्धत, तर कुठे क्षणात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणारी भारतीय साधना !

‘पाश्चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, ‘माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्लेषण (Statistical analysis) करा आणि मग निष्कर्ष काढा.’ याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळते !’ (१९.६.२०१६)

१ इ. ऋषींचे सूक्ष्मातील कळण्याचे सामर्थ्य

‘आपण कानाला रिकामी बाटली, वाटी इत्यादी पोकळी असलेली वस्तू लावली, तर आपल्याला आकाशतत्त्वाचा नाद ऐकू येतो. आपल्याला खोलीच्या पोकळीतील नाद ऐकू येत नाही; मात्र ऋषींना आकाशाच्या पोकळीतील नाद ऐकू येतो. यावरून ऋषींची क्षमता केवढी होती, हे लक्षात येते.’ (२.६.२०१३)

१ ई. ‘स्थुलातील सूक्ष्म कळले नाही, तर सूक्ष्मातील सूक्ष्म कसे कळेल आणि ते कळले नाही, तर सूक्ष्मातीसूक्ष्म ईश्वर कसा कळेल ?’ (१.८.२०१७)

१ उ. ‘स्थुलातील कार्याला मिळणारी प्रसिद्धी तात्कालिक असते आणि ती थोडा काळ टिकते. याउलट सूक्ष्मातील कार्याला विशेष प्रसिद्धी मिळाली नाही, तरी ते अनेक शतके किंवा सहस्रो वर्षे टिकते.’ (३.५.२०१९)

१ ए. सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म-स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’ (४.१२.२०१८)

१ ऐ. सूक्ष्मातील कळण्यासाठी साधनेला पर्याय नाही !

‘एखाद्याला एखादी विभूती आवश्यक आहे का ? तिच्यात देवतेचे तत्त्व आहे का ? असल्यास त्याचे प्रमाण किती ? ते किती दिवस परिणामकारक असेल ?’, अशा तर्‍हेच्या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाला देता येत नाहीत; पण साधनेने सूक्ष्मातील कळू लागले की, उत्तरे तात्काळ मिळतात !, म्हणजेच ‘सूक्ष्मातील कळणे’ हेच सर्वाेत्कृष्ट यंत्र आहे.’ (३.२.२०१९)

१ ओ. दृष्टीला जे जाणवते, त्यापेक्षा मनाला जे जाणवते, ते महत्त्वाचे !

‘रामनाथी आश्रमातील माझ्या खोलीतील पूर्व दिशेकडील दोन खिडक्यांच्या मधली काच ‘दिसत नाही’, असे असले, तरी त्या निरीक्षणापेक्षा तेव्हा ‘भाव जागृत होतो’ हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे. आश्रमातील झाडांकडे पाहून ‘ती चांगली दिसतात’ एवढेच लक्षात येण्यापेक्षा त्यांच्याकडे पाहून ‘चैतन्य आणि आनंद जाणवतो’, हे लक्षात येणे अधिक महत्त्वाचे आहे.’ (५.७.२०१४)

१ औ. ‘डोळे उघडले की, दिसते. तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत न केल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ (१६.१२.२०१८)

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

क्रमश: वाचा उद्याच्या अंकात

  •  सूक्ष्मातून कळण्याचा दुष्परिणाम !
  •  राष्ट्राच्या संदर्भात सूक्ष्मातून आणि स्थुलातून कळले, तरी त्यामुळे लाभ होण्यात येणार्‍या अडचणी
  • सूक्ष्मातील कळण्यासाठीची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधून काढलेल्या पद्धती

(भाग २) वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/550663.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-जगत् :
जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) :
काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण :
एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.