१. समाजसेवेच्या कर्तव्याची जाणीव !
‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाला आज १ मास झाला. देशाने एक नि:स्वार्थी समाजसेवक गमावल्याच्या वेदना मनात आजही जिवंत आहेत. त्यांनी जीवनात जे मिळवले ते कोणत्याही श्रीमंत व्यक्तीलाही पैसे मोजून मिळवणे शक्य नाही. यास्तवच त्या अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून गेल्या आहेत. अशी थोर माणसे या देशाला लाभणे, हे आपले भाग्यच आहे.
२. मनुष्यजन्माचे सार्थक करावे !
जेव्हा माणूस म्हणून जन्माला येतो, तेव्हा त्याच्यावर जी ऋणे असतात पैकी दोन ऋणं म्हणजे ‘समाजऋण’ आणि ‘पितृऋण’ होत. अनाथांची माय-बाप होत ‘मिळालेल्या मनुष्यजन्माचे सार्थक कसे करावे ?’ , याचा पाठच त्या कायम शिकवत राहिल्या, तसेच त्याचा ठसाही उमटवून गेल्या. त्यांच्या विचारांची समाजाला आवश्यकता आहे. ‘मी, माझे घर, माझा मित्र परिवार, नातेवाईक’, या चौकटीत अडकून न रहाता या पलीकडे जात समाजालासुद्धा कुटुंब मानून, त्याचा मनापासून स्वीकार केला, तर आपलाही मनुष्यजन्म सार्थकी लागेल. सिंधुताईंनी समाजातील अनाथ मुलांना मायेच्या ममतेने सांभाळून समाजऋण फेडले.
३. समाजसेवकांना आर्थिक साहाय्यासाठी वणवण करावी लागते !
‘भारतात निवडणुकांत पाण्यासारखा पैसा खर्च होतो’ मग ती अगदी ग्रामीण स्तरावरची निवडणूक असली तरी असेच होते, हे सत्य नाकारता येत नाही. हा विचार करता त्या कालावधीत जो पैसा खर्च होतो तो गरजूंसाठी खर्च झाला, तर भारताचा सामाजिक स्तरावर विपुल प्रमाणात कायापालट होणे दूर नाही; मात्र असा विचार कोण करतो ? तसे होत नसल्यानेच समाजसेवकांना आर्थिक साहाय्यासाठी वणवण करावी लागते यासारखी शोकांतिका नाही.
४. अंतिम श्वासापर्यंत समाजसेवा !
तुमच्यात गरजूंविषयी तीव्र कळकळ असेल, तर त्याचा डेरेदार वटवृक्ष कसा होऊ शकतो ? आणि त्याच्या छत्रछायेचा गरजूंना भक्कम आणि हक्काचा आधार कसा वाटू शकतो ? याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नि:स्वार्थी समाजसेविका सिंधुताई होत. एक स्त्री समाजात जाऊन अतुलनीय असे साहसी कार्य तिच्या अंतिम श्वासापर्यंत कसे करू शकते ? याचेही ठळक उदाहरण सर्वांसमोर आहे.
५. सर्वांनी आनंदी रहाण्यासाठी योगदान द्यावे !
आजकाल बहुतांश सहलीला जातात; कारण काय, तर कामाचा क्षीण दूर करण्यासाठी आणि विरंगुळा मिळण्यासाठी. या मंडळींनी त्यांचा दौरा सिंधुताईंप्रमाणे समाजसेवा करणार्या संस्थांकडे वळवून त्यांचे कार्य जवळून पहावे, तसेच ते बारकाईने जाणून घेत स्वतःच्या वेळेप्रमाणे त्यांच्या कुटुंबात कृतीच्या माध्यमातून सहभाग घ्यावा. असे केले तर ते नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी असेल. ‘स्वतः आनंदी असावे’ असा संकुचित विचार करण्यापेक्षा सर्वांनी आनंदी असावे यासाठी मी काय योगदान देऊ शकतो ? , हे महत्त्वाचे आहे.
६. मुलांनी पालकांत सिंधुताईंना पहावे !
सिंधुताईंच्या निधनाचे वृत्त आल्यावर लगेचच सामाजिक माध्यमांवर त्याच्या ‘पोस्ट’ प्रसारित झाल्या. यावरून लक्षात येते की, सध्याच्या आधुनिक पिढीलाही सिंधुताई परिचित आहेत. त्यांच्याकडून हा वारसा पुढच्या पिढ्यांकडेही जाईल अशी आशा करूया. यालाच जोडून सूत्र असे की, आधुनिकतेचा स्वीकार करणारी आजची पिढी पालकांचे ऐकत नाही आणि स्वतःचेच म्हणणे खरे करते. यामुळे प्रसंगी त्यांना ठेचही लागते. पालकांचे ऐकले गेले, तर पुढे जाऊन धडपडण्याची वेळ येत नाही; कारण तसे झाल्यावर पुन्हा सावरण्यासाठी पालकांनाच झिजावे लागते आणि पाल्याला त्रास झाल्याचा त्यांना जो मानसिक त्रास होतो तो वेगळाच. मुलांनी पालकांतही सिंधुताईंना पहावे. त्यामुळे आपसूकच वागण्या-बोलण्यात पालट होण्यास साहाय्य होईल. परिणामी पालकांसह वाद होणार नाही आणि कुटुंब आनंदी राहील, तसेच पालक म्हणजे काय ? ते समजेल !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई. ( ७.१.२०२२ )