कै. नारायण मुरलीधर गुप्ते उपाख्य कवी ‘बी’ यांचे ‘चाफा बोलेना’, हे काव्य पुष्कळ प्रसिद्ध आहे. ते केवळ एक गीत नसून एका उन्नत साधकाने त्याच्या अध्यात्ममार्गावरील प्रवासाचे केलेले सुंदर रूपकात्मक वर्णन आहे. ‘रंग-रूपाने म्हणजे बाह्यांगाने आकर्षक नसलेले चाफ्याचे फूल त्याच्या मोहक गंधाने सर्वांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे साधनापथावर मार्गस्थ असतांना मनुष्याचे बाह्य रंग-रूप, बाह्य सुख महत्त्वाचे नसून त्याला आत्मानुभूतीचा मिळणारा आंतरिक आनंद फार श्रेष्ठ आहे’, हे या रूपकातून कवीने पुष्कळ सुंदर पद्धतीने सांगितले आहे. या प्रसिद्ध काव्याचे केलेले रसग्रहण म्हणजे आत्मानुभवाशी जवळीक साधण्यासाठी एका साधकाने केलेल्या त्याच्या अध्यात्मप्रवासाचे वर्णन आहे.
१. ‘ही कविता शुद्ध ‘अद्वैत वेदांत तत्त्वज्ञाना’चे प्रतिपादन करणारी आहे.
१ अ. सोनचाफा हे ‘आत्मानुभवाचे, म्हणजेच आध्यात्मिक पातळीवर जीव-शिव यांच्या ऐक्याचे’ प्रतीक असणे : ‘कवितेत चाफा म्हणजे सोनचाफा आहे. अन्य फुलांप्रमाणे याला फारसा आकर्षक आकार वा रंग नसतो, असतो तो अत्यंत मादक सुगंध ! म्हणजे याचं सुख हे बाह्य स्थूल दृश्यात नसून अंतरंगीचा सुगंध असते. बाकीची फुलं दूर अंतरावर असली, तर त्यांचा वास येत नाही; परंतु चाफा कितीही लपवला, तरी याचा सुवास लपत नाही. अन्य फुलं सुकल्यावर त्यांचा सुगंध कमी होतो; परंतु चाफ्याचं तसं नसतं.
असा हा चाफा इथे कवीने ‘आत्मानुभवाचे, आध्यात्मिक पातळीवर जीव-शिव यांच्या ऐक्याचे’ प्रतीक म्हणून वापरला आहे.
१ आ. चाफा म्हणजे स्वतःला आतून येणारा अनुभव ! ‘चाफा फुलेना’ म्हणजे प्रयत्न करूनही आत्मसुखाचा अनुभव येत नाही.
काव्यपंक्ती आणि त्यांचा भावार्थ
१. काव्यपंक्ती
चाफा बोलेना, चाफा चालेना ।
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।। धृ.।।
१ अ. भावार्थ
१ अ १. ‘साधकाने अनेक वर्षे साधना करूनही त्याला आत्मसुखाचा अनुभव येत नाही’, यासाठी त्याने मनोमन व्यक्त केलेली खंत !
१. ‘चाफा’ म्हणजे ‘स्वतःला आतून येणारा अनुभव.’ चाफा खंत करत नसून ‘काही केल्या चाफा फुलत नाही’, याची खंत वाटत आहे. चाफा फुलेना, म्हणजे ‘प्रयत्न करूनही आत्मसुखाचा अनुभव येत नाही.’
२. इथे अध्यात्ममार्गावरील एका साधकाच्या मनातील तळमळ व्यक्त होत आहे. ‘चाफा, खंत करी काही केल्या फुलेना’, म्हणजे साधनेचे प्रयत्न करूनही पुष्कळ काळ लोटला, तरी साधनेचे फळ मिळत नाही, म्हणजेच त्या आत्मसुखाचा अनुभव येत नाही. ‘करी’ म्हणजे ‘कर्मेंद्रियांच्या द्वारे काहीही केले, तरी चाफा फुलत नाही’, म्हणजे आत्मसुखाचा अनुभव येत नाही.
२. काव्यपंक्ती
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी ।
आम्ही गळ्यांत गळे मिळवुन रे ।
२ अ. भावार्थ
२ अ १. प्रापंचिक सुखासाठी केलेली धडपड आणि तिची क्षणभंगुरता अन् निष्फळता
१. या पंक्तींमधून प्रापंचिक सुखासाठी केलेली धडपड सांगितली आहे. साहित्यामध्ये (वाङ्मयामध्ये) आंबा, आम्रवृक्ष, आम्रमंजरी (आंब्याच्या झाडाला आलेला मोहर) यांचा वापर नेहमी काम-पुरुषार्थाशी जोडून करण्यात येतो. ‘संतानप्राप्ती’ ही वैवाहिक जीवनाची सफलता मानली जाते. ‘मातृत्व’ ही स्त्रीच्या जीवनाची परिपूर्णता मानली जाते. त्यामुळे ‘आम्ही प्रपंचात म्हणजे आंब्याच्या वनात गेलो. कोकिळ-मैना यांच्यासमवेत गाणी म्हटली. एकमेकांच्या गळ्यांत गळे घातले. याचा अर्थ भावनात्मक स्तरावर कौटुंबिक जीवनाची सर्व सुखे धुंडाळून पाहिली’; पण ‘चाफा खंत करी, काही केल्या फुलेना !’
२. सर्व प्रापंचिक सुखे क्षणिक ठरली. त्यात दीर्घकाळ टिकण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे प्रपंचात कितीही क्षणिक सुखे लाभली, तरी ती सुखे सार्वकालिक परिपूर्ण अशा आत्मानुभवाच्या पासंगालाही उभी राहू शकली नाहीत; म्हणून कवी आत्मानुभूती न झाल्याची खंत व्यक्त करत आहे.
३. काव्यपंक्ती
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी ।
नागासवे गळाले देहभान रे ।
३ अ. भावार्थ
३ अ १. योगमार्गाची साधना करतांना जागृत झालेल्या आत्मशक्ती कुंडलिनीला केतकीच्या बनाला वेटोळे घातलेल्या नागिणीचे दिलेले हे रूपक आहे आणि ही आत्मानुभवाची अवस्थाही सार्वकालिक नसल्याची खंतही आहे !
१. हा भाग आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचा संकेत दर्शवतो.
२. या कडव्यातील रूपक फारच विलक्षण आहे. केवड्याची रचनाच जगावेगळी असते. बाहेरून काटेरी, मधोमध सरळसोट उभा दांडा आणि त्याच्या टोकाला श्रेष्ठ सुगंधाने परिपूर्ण असलेले सोनेरी कणीस ! केवड्याच्या भोवती नागांचा वावर असतो.
३. इथे साधकाने केलेला योगमार्गाच्या साधनेचा प्रयत्न सुचवला आहे. येथे केतकीचे बन, म्हणजे साधकाने योगमार्गाने केलेली साधना आहे. केतकीचे काटे योगमार्गाचा खडतरपणा सुचवतात.
आंब्याच्या वनातले सुख इतरांच्या समवेत उपभोगले होते (‘म्हटली मैनासवे गाणी’); मात्र येथे केतकीच्या सुगंधाचे रसपान ‘गंध दरवळला मनी’, म्हणजे केवळ स्वतःच्या अंतरंगात केले आहे.
४. हे योगमार्गाचेच वर्णन असल्याचा आणखी एक संकेत कवीने दिला आहे. ‘नागासवे गळाले देहभान’, म्हणजे ‘योगाद्वारे जागृत केली जाणारी आत्मशक्ती कुंडलिनी !’ कुंडलिनीला नागिणीची उपमा, तर योगशास्त्रानेच दिली आहे. ध्यानाचा अभ्यास करतांना कुंडलिनी जागृत होऊन देहभान गळाले आणि ध्यानाच्या त्या अवधीमध्ये विलक्षण आत्मिक अनुभव आला. तरीही हा अनुभव ध्यानाच्या तेवढ्या वेळेपुरताच मर्यादित राहिला. सार्वकालिक (सतत) आत्मानुभवाचा आनंद तिथेही मिळाला नाही.
४. काव्यपंक्ती
चल ये रे, ये रे गड्या, नाचु उडु घालु फुगड्या ।
खेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम् ।।
४ अ. भावार्थ
४ अ १. ‘साधनेचे सर्व प्रयत्न लहान मुलांचे ‘पोरखेळ’ ठरले !
इथे ‘नाचु उडु घालु फुगड्या…. खेळू झिम्मा, झिम् पोरी झिम्…’, या शब्दांच्याद्वारे जणू कवीने सुचवले आहे की, ‘वरील सर्व प्रयत्न शेवटी झिम्मा-फुगड्यांप्रमाणे ‘पोरखेळ’ ठरले. त्यातून थोड्या वेळाकरता मनोरंजन झाले, इतकेच!
५. काव्यपंक्ती
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण ।
उणे करू आपण दोघे जण ।
५ अ. भावार्थ
५ अ १. ‘जीव आणि ईश्वर या दोघांखेरीज इतर विश्वाच्या प्रचीतीचा नाश करणे, हे अद्वैताचे लक्षण !
१. ‘या पंक्तींमध्ये ‘वेदांत तत्त्वज्ञाना’चे स्पष्ट प्रतिपादन आहे.
आ. येथे ‘आम्ही दोघे’ हे रूपक फार वेगळ्या अर्थाने आहे. जीव म्हणजे ‘शरिरात जाणवणारे चैतन्य’ आणि ईश्वर म्हणजे ‘चराचर सृष्टीतील व्यापक चैतन्य !’ हे वरकरणी वेगळे वाटले, तरी एकाच चैतन्याची ही २ रूपे आहेत. आता या दोघांना विश्वाचे अंगण ‘आंदण’ मिळाले आहे. ईश्वराने विश्वाचे संचालन करावे आणि जिवाने (साधकाने) जगाशी व्यवहार करावा.
म्हणजे जिवाने करायचा व्यवहार हा ‘कर्तव्य आणि उत्तरदायित्व’ अशा प्रकारचे लादलेले ओझे नसून ‘मनसोक्त उपभोगण्यासाठी मिळालेले आंदण’; म्हणून त्याने जगाकडे पहावे’, यासाठीच कवीने जगाच्या रूपात मिळालेल्या आंदणाला ‘उणे करण्याची’ शब्दयोजना केली आहे. येथे जीव ईश्वराला उद्देशून म्हणतो, ‘आपण दोघे मिळून आपल्या दोघांच्या अस्तित्वाच्या व्यतिरिक्त जाणवणार्या या जगाच्या प्रचीतीचा नाश करू या, निरास करूया !’’
६. काव्यपंक्ती
जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे ।
आपण करू शुद्ध रसपान रे ।
६ अ. भावार्थ
६ अ १. ‘शुद्ध रसपान करूया’, म्हणजे ‘एकरूपतेचा’ अनुभव घेऊया !
‘हेसुद्धा साधकाचे ईश्वराला उद्देशूनचे शब्द आहेत. बाकीचं जग लौकिक व्यवहारात लडबडले आहे. त्याला तसंच राहू दे. तू आणि मी एक होऊन आपल्या दृष्टीतून या जगाच्या ‘आत्मभिन्न प्रतीती’चा नाश करूया !
(‘आत्मभिन्न प्रकृती’ म्हणजे ‘ईश्वर आणि मी वेगळे आहोत’ या भिन्नतेच्या द्वैताची सर्वसामान्यांना जाणवणारी प्रतीती म्हणजेच अनुभव. तो नष्ट करून आपण आत्मानुभवाचे, अद्वैताच्या आनंदाचे रसपान करूया.’- संकलक)
७. काव्यपंक्ती
चाफा फुले आला फुलून,
तेजी दिशा गेल्या आटून,
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे ।
७ अ. भावार्थ
७ अ १. मी आणि माझा आत्मानुभव यांत भेद न उरता आत्मस्वरूपाचा बोध होणे आणि अचानक ती घटना घडली ! चाफा फुलला ऽ ऽ !!!
जीव-शिवाच्या एकात्मस्वरूपाचा त्याला बोध झाला. त्या तेजामध्ये दिशा आणि काळ ही दृश्य जगाच्या भेदाच्या कल्पनेची परिमाणे विरून गेली ! हा एकरूपतेचा अनुभव इतका परिपूर्ण आहे की, तिथे ‘कोण मी चाफा ?’ म्हणजे ‘मी आणि माझा आत्मानुभव’ यांत भेद राहिला नाही.
‘कोठे दोघे जण रे ?’, याचा अर्थ ‘मी म्हणजे, सीमित अस्तित्व असलेला जीव’ आणि ‘व्यापक अस्तित्व असलेला, ईश्वर’ हाही भेद उरला नाही.’
ही कविता म्हणजे ‘एका आत्मानुभवाशी जवळीक साधलेल्या श्रेष्ठ आध्यात्मिक साधकाचे उद्गार आहेत’ इतकंच म्हणता येईल.’
– संग्राहक : श्रीमती अनुपमा देशमुख, पुणे (डिसेंबर २०२१)
(साभार : दैनिक ‘सकाळ’ सप्टेंबर/ऑक्टोबर २०२०)