आनंदी, निर्मळ मनाच्या, भूमिकेशी एकरूप होऊन अभिनय करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेल्या पुणे येथील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मामेआत्याची (सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांची) मुलगी, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मामे-आत्येबहीण आहे.

पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी

श्रीमती अनुपमा देशमुख रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या असतांना त्यांचे नाट्यक्षेत्राच्या संदर्भातील अनुभव जाणून घेण्याच्या उद्देशाने माझे त्यांच्याशी संभाषण झाले. त्या वेळी मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीमती अनुपमा देशमुख

१. श्रीमती अनुपमा देशमुख यांना आश्रमात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर जाणवलेले आध्यात्मिक त्रास

अ. श्रीमती अनुपमा देशमुख यांची रामनाथी आश्रमात येण्याची सर्व सिद्धता झाल्यानंतर आश्रमात जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांना ‘अकस्मात् अस्वस्थ वाटणे, छातीत धडधडणे आणि हालचाल मंदावणे’, असे त्रास होऊ लागले. त्यामुळे त्यांना ‘रामनाथी आश्रमात जाता येईल कि नाही ?’, असे वाटू लागले. तेव्हा त्यांनी ‘सकाळी उठल्यावर अंदाज घेऊया’, असे ठरवले. दुसर्‍या दिवशी त्यांना बरे वाटत असल्यामुळे त्या आश्रमात येऊ शकल्या.

आ. त्यांच्याकडून अभिनय क्षेत्रासंदर्भात माहिती घेण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांना भेटणार होतो. त्या वेळी जिन्यातून पायर्‍या उतरत असतांना काही कारण नसतांना अकस्मात् त्या गुडघ्यांवर पडल्या. त्यांच्या समवेत असलेल्या साधिकेला ‘त्यांना कोणीतरी ढकलले आहे’, असे जाणवले.

इ. त्यांनी नाट्याच्या संदर्भात सांगितलेल्या सूत्रांचे साधिकेने टंकलेखन केल्यावर अजून काही लिहिणे किंवा काही भाग न्यून करणे, या अनुषंगाने संबंधित धारिकेचे त्यांना संगणकावर वाचन करायचे होते. त्या वाचन करतांना त्यांना त्यांच्या डाव्या डोळ्याच्या पापणीवर अकस्मात् पुळी आल्यासारखे जाणवले. त्यांचे वाचन पूर्ण झाल्यावर हा त्रास न्यून झाला.

या तीनही प्रसंगांत श्रीमती अनुपमा देशमुख यांना ‘हा वाईट शक्तीच्या त्रासाचा भाग आहे’, हे लक्षात आले. ‘देवाच्या कृपेने त्रासावर मात होऊन त्या आश्रमात येऊ शकल्या आणि आमच्याशी संवाद साधू शकल्या’, हे त्यांनी अनुभवले.

२. श्रीमती अनुपमा देशमुख यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

२ अ. आनंदी : काकू स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हसणे निखळ आहे.

२ आ. उत्तम निरीक्षणक्षमता : त्यांचे साधकांविषयीचे निरीक्षण चांगले आहे. ‘साधक नामजपादी उपाय करतांना करत असलेले न्यास, मुद्रा किंवा अन्य उपाय कशासाठी करतात ?’, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. ‘साधक किती निर्मळ आणि निःस्वार्थी भावाने सर्व करतात’, याचे त्यांना पुष्कळ कौतुक वाटते.

२ इ. अन्यायाची चीड : एका प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याच्या मुलाच्या संदर्भातील एका प्रकरणात ‘त्याची निर्दाेष सुटका व्हावी’, यासाठी समाजातील लोक तो चुकीचा वागला असूनही त्याचे समर्थन करत होते. तेव्हा अनुपमाकाकूंनी लगेच ‘व्हॉट्सॲप’वर एक प्रबोधनपर संदेश बनवून तो त्यांच्या ओळखीच्या ६० ते ७० जणांना पाठवला. त्या वेळी टंकलेखन करतांना काकूंची बोटे दुखली आणि त्यांना पुष्कळ वेळ द्यावा लागला, तरी त्यांनी ते केले. यावरून ‘त्यांना अन्यायाची चीड आहे, तसेच त्याविरुद्ध लढण्याची त्यांची सिद्धताही आहे’, हे माझ्या लक्षात आले.

२ ई. अभिनयाशी एकरूप झालेल्या श्रीमती अनुपमा देशमुख !

१. काकू अभिनय क्षेत्राच्या संदर्भात बोलतांना देहभान विसरतात. आजही अनेक चित्रपट किंवा नाट्य यांतील अनेक संवाद आणि अनेक प्रसंग त्यांच्या पूर्णपणे लक्षात आहेत. त्यांची त्या विषयाच्या संदर्भातील स्मृती पुष्कळ चांगली आहे. प्रत्यक्षात वैयक्तिक आयुष्य किंवा दैनंदिन जीवन याविषयी बोलतांना काही वेळा त्यांना विस्मरण होते; परंतु अभिनय क्षेत्राच्या संदर्भात त्या उत्स्फूर्तपणे सांगतात. त्या अभिनय, त्या संदर्भातील प्रसंग, चित्रपट आणि नाट्य यांतील संवाद, यांविषयी सांगतांना ‘तो भाग प्रत्यक्ष आपल्यासमोर घडत आहे’, असेच आपल्याला जाणवते. तेव्हा ‘त्या अभिनयाशी किती एकरूप झाल्या आहेत’, याची मला जाणीव झाली.

२. त्या अन्य विषयांवर बोलत असतांना त्यांचे बोलणे एका लयीत असते. त्या अभिनयाविषयी बोलतांना आवश्यकतेनुसार आवाजात पालट किंवा बोलण्याच्या लयीत पालट करतात. हे त्यांचे वेगळेच वैशिष्ट्य असल्याचे मला जाणवले.

२ उ. अल्प अहं आणि कर्तेपणा नसणे

१. त्यांचे वय अधिक असूनही त्या पुष्कळ तरुण दिसतात; मात्र त्यांना याचा अहंकार नाही.

२. त्या प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते राजा नेने यांच्या कन्या आहेत. याचाही त्यांना अहंकार नाही. त्याविषयी त्या स्वतःहून कोणाला सांगत नाहीत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्याचा कधी आधारही घेतला नाही. हे त्यांनी सांगितलेल्या प्रसंगातून, तसेच आश्रमात माझ्या त्यांच्याशी झालेल्या संपर्कातून लक्षात आले. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांना जवळून अनुभवले आहे. आजकाल चित्रपटसृष्टीत ओळख असल्यास सर्वसामान्यांचाही अहंकार जागृत होतो; परंतु अनुपमाकाकूंचा या क्षेत्रातील अनुभव ऐकल्यावर ‘ते सहज आहे’, असे त्यांना वाटते. याचे श्रेय त्या त्यांचे वडील, देव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देतात.

२ ऊ. त्यांच्याशी बोलतांना ‘त्या काही वेळ बालकभावात, तर काही वेळा क्षात्रभावात आहेत’, असे मला जाणवले.

२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

१. त्यांच्या एका नातेवाइकामुळे त्यांना कोर्ट-कचेर्‍यांना सामोरे जावे लागले. त्या वेळी ‘आपल्याच नातेवाइकाशी आपण कसे लढायचे ?’, असा विचार आल्यावर त्यांना ‘त्यांची स्थिती अर्जुनासारखी होती’, असे वाटले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला श्रीकृष्णाप्रमाणे मार्गदर्शन केल्यामुळेच मी ती ‘केस’ जिंकू शकले’, असा त्यांचा भाव आहे. हे सांगतांना त्यांचा भाव जागृत झाला.

२. कुटुंबात आलेल्या एका अडचणीमुळे त्यांचा आत्मविश्वास उणावला होता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना केलेल्या साहाय्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. ‘त्यामुळेच आज मी जीवनात आनंदी आहे’, असे त्यांना वाटते. याबद्दल त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते. हे सांगत असतांना त्या काही क्षण स्तब्ध झाल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू आले.

३. त्यांनी आम्हाला चित्रपटक्षेत्राच्या संदर्भातील अनेक अनुभव आणि प्रसंग सांगितले. आम्ही त्यांना ‘याचा आम्हाला ‘नाट्यकलेतून साधना’ या दृष्टीने लाभ होणार आहे’, हे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. ‘माझा या कार्यात सहभाग झाला’, याबद्दल त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.

४. ‘विविध क्षेत्रांत साधना कशी करावी ? संगीत-नृत्य-गायन-वादन-नाट्य या क्षेत्रांत, तसेच दैनंदिन जीवन जगतांनाही साधक साधना आणि सेवा म्हणून करत असलेल्या कृती पाहून त्या म्हणाल्या, ‘‘हे कार्य केवळ परात्पर गुरु डॉ. आठवलेच करू शकतात. खरंच मी भाग्यवान आहे.

मला ते लाभले !’’

३. श्रीमती अनुपमा देशमुख यांच्याशी बोलतांना आलेल्या अनुभूती

अ. ९.१.२०२२ या दिवशी अनुपमाकाकूंशी बोलत असतांना ‘त्या लघु (Zoom out) होत आहेत, म्हणजेच भिंगाच्या साहाय्याने पाहिल्यावर जसे चित्र दूरदूर जाते आणि व्यापक (Zoom in), म्हणजेच भिंगाच्या साहाय्याने पाहिल्यावर जसे चित्र मोठे दिसते, तशा मोठ्या होत आहेत’, असे मला दिसले. ही आकाशतत्त्वाच्या संदर्भातील अनुभूती असल्याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितले.

आ. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला ‘त्यांची दृष्टी ऊर्ध्वगामी ध्यानस्थ असल्याचे आणि त्या सहजतेने ध्यानस्थितीत असतात’, असे जाणवले.

इ. त्यांनी ‘संत तुकाराम’ या चित्रपटात श्री इंद्रायणीदेवीची (इंद्रायणी नदी) भूमिका साकारली होती. त्या संदर्भात त्यांच्याशी बोलतांना आणि त्यांनी केलेली भूमिका पहातांना ‘त्या देवीस्वरूप आहेत’, असे मला जाणवले. (कु. मधुरा भोसले (सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनाही श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या मागे एका देवीचे दर्शन झाल्याचे त्यांच्याकडून कळले.)

ई. १२.१.२०२२ या दिवशी त्यांच्याशी बोलण्यापूर्वी ‘माझ्याजवळ काहीतरी घट्ट, चिकट असे काळ्या शक्तीचे आवरण आहे’, असे मला जाणवत होते. त्यांच्याशी बोलत असतांना आणि बोलून झाल्यावर मला एकदम हलके वाटले. चित्रपट सृष्टीतील त्यांनी सांगितलेले त्यांच्या वडिलांचे (राजा नेने यांचे) आणि स्वतःचे अनुभव ऐकतांना मला वेगळ्याच विश्वात असल्यासारखे जाणवले.

उ. त्यांचे बोलणे ऐकतांना मला २ वेळा शुद्ध पाण्याचा प्रवाह वहातांना दिसला.

ऊ. त्या पुष्कळ निर्मळ असल्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावर मला उत्साह जाणवतो.’

– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक