शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन करण्यात आले पात्र !

तब्बल ७८ कोटी ८० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड !

  • असे अपात्र विद्यार्थी लाच देऊन शिक्षक झाल्यावर ते मुलांसमोर कोणता आदर्श ठेवणार, याचा विचारच न केलेला बरा ! सध्या शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा का झाला आहे, हे यावरून लक्षात येईल ! – संपादक

  • पात्र विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला आहे, तो कोण भरून काढणार ? – संपादक

  • आजपर्यंत शिक्षणक्षेत्रात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे वारंवार उघड झाले आहे. ही स्थिती सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
शिक्षक पात्रता परीक्षेत अपहार

 

पुणे – वर्ष २०१९-२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस अन्वेषणात उघड झाला आहे. पुणे येथील सायबर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात ७८ कोटी ८० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.

वर्ष २०१९-२० मध्ये शिक्षक पात्र परीक्षेत १ लाख ५४ सहस्र ५९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यांतील १६ सहस्र ७०५ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या या  विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांची माहिती पडताळली असता यांपैकी ७ सहस्र ८८० विद्यार्थी अपात्र असल्याचे उघड झाले. या सर्व विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांचे गुण वाढवण्यात आल्याचे उघड झाले आहे. शिक्षक पात्र परीक्षा आणि आरोग्य भरती परीक्षा यांतील या अपहारप्रकरणी आतापर्यंत ४० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर, तसेच परीक्षा आयोजित करणार्‍या ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आस्थापना’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांचा समावेश आहे. यामध्ये दलाल अंकुश आणि संतोष हरकळ यांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. याविषयी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के म्हणाल्या, डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे अपात्र ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. अपात्र परीक्षार्थींचे परस्पर गुण वाढवणे, त्यांना पात्र करणे, काहींना थेट प्रमाणपत्र देणे अशाप्रकारे हा अपहार झाला आहे.