भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली मागणी फिलीपिन्सकडून !

नवी देहली – स्वदेशी बनावटीच्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची पहिली मागणी फिलीपिन्स या देशाने भारताकडे केली आहे. या संदर्भात फिलीपिन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ समवेत २ सहस्र ८०८ कोटी रुपयांच्या (३७४ मिलियन अमेरिकी डॉलर्स) करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रात मोठा इतिहास रचला गेल्याचे म्हटले जात आहे.

फिलीपिन्सने चीनविरुद्धच्या सैनिकी सिद्धतेसाठी भारत आणि रशियाने संयुक्तपणे सिद्ध केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनने त्याचा अधिकार सांगितल्याने चीन आणि फिलिपाइन्स या देशांत अनेक दिवसांपासून वाद चालू आहे.