कोंड्ये (राजापूर) येथील कोल्हेवाडी येथे राजरोसपणे होत आहे उत्खनन !
|
राजापूर – तालुक्यातील कोंड्ये गावातील कोल्हेवाडी येथे रस्त्यालगत राजरोसपणे सहस्रो ब्रास मातीचे उत्खनन चालू आहे. अवघ्या ५०० ब्रास माती उत्खननाची अनुमती घेऊन पूर्ण डोंगरच कापला जात असल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे. अवैधपणे मातीचे उत्खनन आणि तिची वाहतूक होत असतांना तहसील प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१. तालुक्यातील कोंड्ये तर्फे सौंदळ महसुली कार्यक्षेत्रात येणार्या कोंड्ये कोल्हेवाडी येथील रस्त्यालगत मागील १५ दिवसांपासून ‘पोकलेन’च्या साहाय्याने डोंगराची माती खोदण्याचे काम चालू आहे. येथील मातीची डंपरच्या डंपर भरून सतत वाहतूक केली जात आहे.
२. याविषयी महसूल प्रशासनाकडे माहिती घेतली असता ‘संबंधिताने ५०० ब्रास माती उत्खननाची अनुमती घेतली आहे’, असे सांगण्यात आले.
३. या प्रकारामुळे पर्यावरणाला हानी तर पोचत आहेच, तसेच ५०० ब्रासच्या नावाखाली सहस्रो ब्रास माती उत्खनन चालू असल्याने लक्षावधी रुपयांचा सरकारचा महसूलही बुडत आहे.