मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी समीर कुळकर्णी यांचा गंभीर आरोप !
श्री. समीर कुलकर्णी यांनी केलेले आरोप न्याययंत्रणा, राजकारणी आणि अन्वेषण यंत्रणा यांतील फोलपणा उघड करणारे आहेत. हे लोकशाहीसाठी घातक असून याविषयी गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे. – संपादक
पुणे – वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये स्पर्धा चालू आहे. या राजकीय साठेमारीत हा खटला १३ वर्षे रखडला आहे, असा गंभीर आरोप मालेगाव बाँबस्फोटातील एक आरोपी श्री. समीर कुलकर्णी यांनी २४ जानेवारी २०२२ या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मालेगाव बाँबस्फोटाचा खटला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय्.ए.’च्या) विशेष न्यायालयात चालू आहे. या खटल्याच्या नियमितच्या सुनावणीसाठी श्री. समीर कुलकर्णी पुणे येथून मुंबई येथील विशेष न्यायालयात नियमितपणे आणि वेळेत उपस्थित रहातात; मात्र अन्य आरोपी उपस्थित रहात नसल्यामुळे खटल्याची सुनावणी होत नाही. असा प्रकार मागील काही कालावधीपासून चालू असल्यामुळे निर्दाेष आरोपी मागील १३ वर्षे न्यायापासून वंचित राहिले आहेत. न्यायालयाने समज देऊनही अन्य आरोपी सुनावणीसाठी उपस्थित रहात नसल्यामुळे अखेर पत्रकार परिषद घेऊन श्री. समीर कुलकर्णी यांनी त्यांचा असंतोष व्यक्त केला.
या वेळी श्री. समीर कुलकर्णी म्हणाले,
१. खटला लांबल्यामुळे या प्रकरणातील निर्दाेष आरोपींचे जीवन पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागले आहे. या धक्क्यामुळे आरोपींच्या काही नातेवाइकांचा, तर काही साक्षीदारांचा मृत्यूही झाला आहे.
२. आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा या दोन्ही अन्वेषण यंत्रणांनी राजकीय सोयीनुसार या गंभीर गुन्ह्याचे अन्वेषण केले आहे. दोन्ही यंत्रणांच्या अन्वेषणात विसंगती आणि विरोधाभास आहे.
३. दोन्ही अन्वेषण यंत्रणांनी विशेष न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय या ठिकाणी सुनावणीच्या वेळी वेगवेगळी भूमिका घेऊन खटला प्रलंबित ठेवण्याचे काम केले आहे.
४. या प्रकरणात निर्दाेष देशभक्त नागरिकांना गोवण्यात येऊन त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेण्यात आला.