१. अमेरिकेत वास्तव्याला आल्यावर नोकरी करावी लागणे
१ अ. ईश्वरकृपेनेच नोकरी करत असून नोकरीच्या ठिकाणी ‘सनातनच्या आश्रमात आहे’, असे वाटणे : ‘मी भारतात रहात असतांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ केला. काही वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेत वास्तव्याला आलो. मी भारतात असतांना कधीही नोकरी केली नाही. आम्ही अमेरिकेत आल्यावर मला नोकरी करावी लागली. येथे आल्यावर ‘ईश्वरकृपेनेच मी नोकरी करत आहे’, असे मला वाटते. नोकरीच्या ठिकाणी ‘मी सनातनच्या आश्रमातच आले असून तिथे असणारे अन्य कर्मचारी साधकच आहेत’, असे मला वाटते.
१ आ. चारचाकी चालू करतांना श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘भगवान श्रीकृष्णच गाडी चालवत असून स्वतः केवळ माध्यम आहे’, असे वाटणे : अमेरिकेत आल्यावर मी ईश्वराच्या कृपेने चारचाकी वाहन चालवायला शिकले. मी चारचाकी चालू करतांना प्रथम श्रीकृष्णाला प्रार्थना करते, ‘हे श्रीकृष्णा, तूच मला कार्यालयात घेऊन चल.’ त्यानंतर ‘भगवान श्रीकृष्णच गाडी चालवत असून मी केवळ माध्यम आहे’, असे मला वाटते. कार्यालयातून निघतांना मी श्रीकृष्णालाच प्रार्थना करते, ‘तूच मला घरी पोचव’ आणि घरी आल्यावर ‘देवा, तूच मला घरी सुखरूप पोचवलेस’, यासाठी मी तुझ्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे’, अशी कृतज्ञता व्यक्त करते.
२. सनातननिर्मित अत्तर लावल्यामुळे झालेला लाभ
२ अ. सनातनचे अत्तर लावल्यामुळे साधिका आणि तिचे यजमान यांची कानदुखी अन् सासूबाईंच्या हाताचे बोट दुखणे थांबणे : मी अमेरिकेत असतांना एकदा माझा कान दुखत होता. मी जानेवारी २०२० मध्ये भारतात आले होते. तेव्हा येथील आधुनिक वैद्यांनी माझ्या कानाची तपासणी करून सांगितले, ‘‘तुमच्या कानाचा पडदा पुष्कळ पातळ झाला आहे.’’ त्यांनी ५ दिवसांची औषधे दिली होती. मी अमेरिकेत आल्यावर कार्यालयात असतांना पुन्हा माझा कान दुखायला लागला. त्यानंतर मी प्रार्थना करून सनातनचे अत्तर माझ्या कानाच्या मागे आणि पुढे लावले. त्यानंतर ८ दिवसांतच माझा कान दुखायचा थांबला. एकदा माझ्या यजमानांची दाढ दुखत असल्यामुळे त्यांचा कान दुखत होता. त्यांनी कानाच्या मागे अत्तर लावल्यावर त्यांचाही कान दुखायचा थांबला. माझ्या सासूबाईंच्या हाताचे मधले बोट दुखायचे. त्यांनी सनातनचे अत्तर बोटाला लावले. त्यानंतर त्यांचेही बोट दुखायचे थांबले.
३. ईश्वराच्या कृपेने चाकरीच्या ठिकाणी समष्टी साधना करण्याची संधी मिळणे
३ अ. कार्यालयातील सहकार्यांना सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी सात्त्विक उत्पादनांची मागणी करणे : मी अत्तर लावून कार्यालयात जाते. तेव्हा तेथील सहकारी मला विचारायचे, ‘‘तुम्ही कोणता ‘स्प्रे’ लावून येता ?’’ मी त्यांना सनातनचे अत्तर, कापूर आणि कुंकू यांचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी सात्त्विक उत्पादनांची मागणी केली. तेव्हा ‘ईश्वरच माझी साधना करवून घेत असून मी केवळ माध्यम आहे’, असे मला वाटले.
३ आ. कार्यालयातील सहकार्यांना दानाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे : मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘अधिक मासात अर्पण देऊ शकतो’, अशी सूचना वाचली. त्यानंतर मी कार्यालयातील सहकार्यांना दानाचे महत्त्व सांगितले. त्या वेळी मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सहकार्यांनी आनंदाने देवाच्या चरणी अर्पण दिले.
४. वास्तूत चैतन्य जाणवणे
४ अ. ‘आमच्या घरातील देवघर रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरच आहे’, असे मला वाटते.
४ आ. अमेरिकेतील कडक थंडीतही तुळस चांगली रहाणे आणि तुळशीमुळे घरात चैतन्य जाणवणे : श्रीकृष्णाच्या कृपेने आमच्या घरी तुळस, लिंब आणि मिरची यांची झाडे आहेत. तुळशीच्या झाडामुळे घरी पुष्कळ चैतन्य जाणवते. येथे ४ – ५ मास उन्हाळा असतो. तेव्हा मी तुळशींची रोपे अंगणात ठेवते. नंतर ८ मास ही रोपे घरात ठेवावी लागतात. येथे पुष्कळ थंडी आणि बर्फ पडत असल्यामुळे झाडे जगत नाहीत; परंतु आमच्याकडील तुळशीची रोपे आणि लिंबाची झाडे जशीच्या तशी आहेत. ही झाडे ४ – ५ वर्षांपासून चांगली आहेत, ही ईश्वरकृपाच आहे. तुळशीमुळे ‘घरी प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहे आणि तोच आमचे रक्षण करत आहे’, असे मला वाटते.
५. कृतज्ञता
आपत्काळामध्ये गुरुमाऊलीच आमचा आधार आहे. त्यांच्यामुळेच आम्ही अमेरिकेत निश्चिंत आणि सुरक्षित आहोत. आम्ही अमेरिका येथे येऊनही त्यांनी आम्हाला त्यांच्याशी जोडून ठेवले आहे. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. मीना प्रवीण पटेल, केंटन मिचीगन, अमेरिका. (२.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |