आपल्या देशाला ‘इंडिया’ नव्हे, ‘भारत’ या नावाने संबोधून राष्ट्रीय अस्मिता जागवा !

आपल्याला भौतिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळाले, तरी आपण परकियांच्या मानसिक दास्यत्वातून सुटलेलो नाही. आजही देशाला सर्व जण ‘इंडिया’ या शब्दाने ओळखतात. देशाचे खरे नाव ‘भारत’ आहे, तर ‘इंडिया’ हे परकियांनी भारताला दिलेले नाव आहे.

१. ‘आज आपल्या देशाला ‘भारत’ आणि ‘इंडिया’ अशा दोन्ही नावांनी ओळखतात. संपूर्ण जगामध्ये दोन नावे असणारा भारत हा बहुदा एकमेव देश असावा.

२. भारत हे नाव प्राचीन असल्याचे ‘महाभारत’ ग्रंथावरून लक्षात येते.

३. जर आपण ‘भारत शासन, भारतीय राज्यघटना आणि भारतमाता की जय’, तसेच राष्ट्रगीतामध्ये ‘भारतभाग्यविधाता’, असे शब्दप्रयोग करतो, तर मग आपल्याला ‘भारत’ नावाचे वावडे (ॲलर्जी) का ?

४. भारत या शब्दाचे इंग्रजीत स्पेलिंग लिहिणेही कठीण नाही.

५. आज ‘मद्रास’चे चेन्नई, ‘बॉम्बे’चे मुंबई झाले, तर आपल्या देशाचे ‘भारत’ हेच नाव प्रचलित होऊ नये ?

६. पूर्वीच्या ‘सिलोन’चा संपूर्ण जग आज ‘श्रीलंका’ म्हणून उल्लेख करते, तर आपल्या देशालाही संपूर्ण जगाने ‘भारत’ याच नावाने का संबोधू नये ?

७. ‘भारत’ हा शब्द स्वतंत्र आहे. त्याची सर ‘इंडिया’ या शब्दाला येऊच शकणार नाही.’

– श्रीकृष्ण महादेव बर्वे, गोवा. (दै. नवप्रभा १८.१०.१९९९)