जे.एन्.यू.चा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्या विरोधात देशद्रोहाचा आरोप निश्‍चित !

इमाम याचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक

डावीकडे जे.एन्.यू.चा विद्यार्थी शर्जिल इमाम

नवी देहली – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) विरोधात झालेल्या आंदोलनांच्या वेळी प्रक्षोभक भाषणे केल्याच्या प्रकरणी देहली सत्र न्यायालयाने जे.एन्.यू.चा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्यावर देशद्रोहाचा आरोप निश्‍चित केला. शर्जिल इमाम याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ (देशद्रोह), १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये शत्रुत्वास खतपाणी घालणे), १५३ ब (राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने प्रतिकूल वक्तव्य), ५०५ (सार्वजनिक गैरकृत्यास कारणीभूत वक्तव्ये.) आणि यूएपीए कलम १३ (बेकायदा कारवायांसाठी शिक्षा) असे आरोप निश्‍चित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

शर्जिल इमाम याने १३ डिसेंबर २०१९ या दिवशी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाच्या परिसरात आणि १६ डिसेंबर २०१९ या दिवशी अलीगड मुस्लिम विद्यापिठात भाषणे केली होती. त्याने भाषणांत आसाम आणि उर्वरित ईशान्येतील राज्यांना भारतापासून तोडण्याची धमकी देणारे वक्तव्य केले होते. इमामच्या भाषणानंतर हिंसक दंगली झाल्याचे सांगण्यात आले आहे. शर्जिल जानेवारी २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी देहली पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले होते.