इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २४ जानेवारी (वार्ता.) – इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे प्राणवायूअभावी शेकडो माशांची तडफड होत असून अनेक माशांचा मृत्यू होत आहे. ४ दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातही कसबा-बावडा येथे पंचगंगा नदीत मृत मासे आढळून आले होते. यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजी येथेही पाणी प्रदूषण रोखण्यात प्रशासन असमर्थ ठरत असून प्रदूषण विभागही डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. (गणेशोत्सवातच श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते असा निष्कर्ष काढून गेले २ वर्षे कोल्हापूर शहरासह पंचगंगेच्या जवळपास सर्वच काठांवर विसर्जन बळजोरीने बंद करण्यात आले आहे. आता कोणत्याही प्रकारच्या मूर्तींचे विसर्जन नसतांना प्रदूषणामुळे होणार्या हानीचे दायित्व कुणाचे ? याचसमवेत गणेशोत्सव काळातच प्रदूषण दिसणारे पर्यावरणप्रेमी आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत ? – संपादक)
१. कोल्हापूरच्या पश्चिमेला उगम पावलेली पंचगंगा नदी नृसिंहवाडीला कृष्णा नदीला मिळते. या नदीच्या उगमापासून संगमापर्यंतच्या प्रवाहात अनेक गावांतून मिसळणारे सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
२. नदी प्रदूषणामुळे नदीच्या शेजारी असलेल्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असून जलचरांचे प्राणही धोक्यात आहेत.
३. यावर अनेक वेळा आंदोलन झाले; मात्र मासे मृत होण्याचे प्रमाण गेल्या ४ वर्षांत सातत्याने वाढत असून प्रदूषण हेच मुख्य कारण असूनही त्यावर प्रशासन ठोस उपाययोजना काढतांना दिसत नाही.