सोव्हिएत संघाप्रमाणे चीनचे तुकडे होऊ शकतात !  

चीनच्याच परराष्ट्र सल्लागाराची चेतावणी

जिया किंग्गुओ

बीजिंग (चीन) – चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.

१. हाँगकाँगमधील ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’मध्ये जिया यांचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या नादामध्ये संरक्षणावर अत्याधिक खर्च केल्याने चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात. सुरक्षेसाठी अत्याधिक खर्च केल्याने हानी अधिक आणि लाभ अल्प प्रमाणात होऊ शकतो. सुरक्षेसाठी निसर्गाकडे दुर्लक्ष करणे आणि डोळे बंद करून त्याला प्रोत्साहन देणे देशाला सुरक्षित करण्याऐवजी असुरक्षितच करत आहे. ‘चीनमधील मोठ्या शाळांमध्ये प्रमुख धडा म्हणून सोव्हिएत संघाचे तुकडे कोणत्या कारणांमुळे झाले, त्या चुका न करण्याचे शिकवण्यात येते. हा धडा चीनच्या सत्ताधारी नेत्यांनी शिकणे आवश्यक आहे’, असेही जिया यांनी या लेखात म्हटले आहे.

२. जपानच्या ‘निक्केई एशिया’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या धोरणांना ‘विषम’ आणि ‘धोकादायक’ म्हटले आहे. ‘शी जिनपिंग स्वतःच त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट आहे’, असेही यात म्हटले आहे. यात पुढे म्हटले आहे की, अतीआत्मविश्‍वास चीनच्या विकासासाठी धोकादायक आहे. चीन आर्थिक मंदीचा सामना करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पुढे जाण्याचा चीनचा प्रयत्न अयशस्वी होतांना दिसत आहे.