राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या वेळी नागपूर येथे गोंधळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन !

नागपूर – २३ जानेवारी या दिवशी एम्.पी.एस्.सी. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा १ सील नियमबाह्य पद्धतीने शहरातील एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आला आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. या घटनेनंतर परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ‘सदर्न पॉइंट’ शाळेच्या परीक्षा केंद्रावर आंदोलन केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, २३ जानेवारीच्या सकाळी त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आले आहेत, अशी माहिती दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोचले, तेव्हा परीक्षा केंद्रावरील कर्मचार्‍यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अभाविपने संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी, तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून देत परीक्षा केंद्रासमोर ठिय्या आंदोलन चालू केले.

पोलिसांचा दावा आहे की, प्रश्नसंचाचे तिन्ही सील पेपर चालू होईपर्यंत शाबूत होते. पोलिसांनी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर अभाविपच्या एका कार्यकर्तीला परीक्षा केंद्रात नेऊन सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला, तर अभाविपच्या कार्यकर्तीचा आरोप आहे की, परीक्षा केंद्रप्रमुख आणि एक लिपिक यांनी तिच्यासमोर प्रश्न संचाच्या ३ सील पैकी १ सील आधीच फोडण्यात आल्याचे मान्य केले. या घटनेनंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिक यांना निलंबित करा, अशी मागणी लावून धरली आहे.


‘एम्.पी.एस्.सी.’चा पेपर फुटलाच नाही ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण

आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

मुंबई – ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१’च्या (एम्.पी.एस्.सी.) परीक्षेतील पेपर फुटल्याच्या संदर्भात काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अधिकृत ट्विटर खात्याद्वारे देण्यात आले आहे.