गांधीनगर बाजारपेठेतील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करावेत ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

गांधीनगर येथील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना निवेदन देतांना राजू यादव, तसेच अन्य शिवसैनिक

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), २३ जानेवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व व्यावसायिक यांच्या आस्थापनांचे फलक मराठीत असावेत, असा निर्णय घेतला आहे. मराठीपणा जपण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राने नेहमीच स्वाभिमानी अस्मिता आणि अभिमान जपला आहे. तेच लक्षात घेत गांधीनगर बाजारपेठेतील व्यापारी बंधूंनी त्यांच्या दुकानांचे नामफलक ठळक मराठीत करावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर येथील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘लवकरात लवकर फलक मराठीत करू’, असे आश्वासन दिले. (गांधीनगर येथील व्यापार्‍यांच्या दुकानांचे फलक मराठीत असावेत या मागणीसाठी निवेदन देणार्‍या शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांचे अभिनंदन ! वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? व्यापार्‍यांनी दुकानांचे नामफलक कटाक्षाने मराठीतच ठेवले पाहिजेत आणि ते तसे असण्यासाठी प्रशासनाने लक्ष ठेवायला हवे ! – संपादक)

विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनीना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व दुकाने, आस्थापने, वाणिज्यिक संस्था, उपाहारगृहे, आहार गृहे इत्यादींचे नामफलक मराठीत लिहिण्याविषयी शासनाने ३१ मे २००८ च्या परिपत्रकाद्वारे सर्वांना सूचित केले आहे. तरी त्याचे पालन करण्यात यावे. या वेळी गांधीनगरप्रमुख दिलीप सावंत, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, बाळासाहेब नलवडे उपस्थित होते, तर ‘होलसेल व्यापारी असोसिएशन’चे उपाध्यक्ष अशोक टेल्यानी, ‘सिंधी सेंट्रल पंचायत’चे गुवालदास जे. कट्टार, ‘रिटेल व्यापारी’ अध्यक्ष दिलीप कुकरेजा आदींनी निवेदन स्वीकारले.