नगर – कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या २२ मासांपासून बंद असलेले येथील श्री द्वारकामाई मंदिराचे दक्षिणद्वार पुन्हा भाविकांसाठी चालू करण्यात आले आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाने देश विदेशांतून येणार्या लाखो भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यानुसार २० जानेवारी या दिवशी मध्यान्ह आरतीनंतर हे दार उघडून भाविकांना दर्शन चालू करण्यात आले.
अलीकडेच संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे आणि विश्वस्त मंडळाने श्री द्वारकामाईसाठी स्वतंत्र मंदिर समजून त्याची स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. आता भाविकांनी सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करून श्री द्वारकामाई मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान व्यवस्थापन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.