ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत पुणे (महाराष्ट्र), गोवा आणि देहली येथे अभियानाला समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ हे पुढील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त आहेत. ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हे राष्ट्रव्यापी ‘सनातन संस्थेचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये या पश्चिम महाराष्ट्रात या अभियानाचा प्रसार कसा करावा ? या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. या वेळी सर्वच स्तरांतून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथांचा प्रसार करतांना पुणे जिल्ह्यामध्ये, गोवा आणि देहली या राज्यांमध्ये साधकांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव येथे दिले आहेत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

१ अ. वाचिकेने वाचनालयात ठेवण्यासाठी ग्रंथांचा संच विकत घेणे :

‘सातारा रस्ता, पुणे येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. मधुरा डोईफोडे यांना सनातन संस्थेच्या साधकांनी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची माहिती सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याकडे सनातन संस्थेचे सर्व ग्रंथ आहेत. मला आमच्या वसाहतीच्या वाचनालयात सनातनचे ग्रंथ लोकांना वाचनासाठी ठेवायचे आहेत. त्यामुळे ते वाचून लोकांच्या मनामध्ये देवाप्रती भाव निर्माण होईल आणि ते त्याप्रमाणे कृती करतील.’’ त्यानंतर त्यांनी वाचनालयात ठेवण्यासाठी ग्रंथांचा संच विकत घेतला.

१. पुणे

१ आ. वाचिकेकडे श्राद्धविधी करण्यास आलेल्या पुरोहितांनाही ‘श्राद्धातील कृतीमागील अध्यात्म शास्त्र’ हा ग्रंथ आवडणे आणि त्यांनी स्वतः भ्रमणभाष करून ग्रंथांची मागणी करणे :

सिंहगड रस्ता, पुणे येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. शामल जाधव यांनी ‘श्राद्धातील कृतीमागील अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ (काही प्रती) घेऊन वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी नातेवाईकांना भेट म्हणून दिला. या वेळी सौ. जाधव म्हणाल्या, ‘‘सनातन संस्थेने संकलित केलेले ग्रंथ आम्ही वाचतो. आमच्याकडे विधी करण्यास आलेल्या गुरुजींनाही हा ग्रंथ पुष्कळ आवडला. त्यांनी  भ्रमणभाष करून हा ग्रंथ मागवून घेतला. या ग्रंथांतून आम्हाला प्रत्येक कृतीमागील शास्त्र समजते, तसेच सनातन संस्थेच्या वतीने प्रसारित होणार्‍या धर्मशिक्षणाच्या संदर्भातील ग्रंथांची माहिती असणार्‍या पोस्ट (लिखाण) ‘व्हॉटस्ॲप स्टेटस्’ला ठेवल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.’’

१ इ. सनातन संस्थेचे ‘दत्त’, ‘मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म’ आणि ‘देवीपूजनाचे शास्त्र’ हे लघुग्रंथ विकत घेऊन सासर्‍यांच्या १३ व्याच्या विधीला नातेवाइकांना भेट देणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुनीता कुलकर्णी ! : सिंहगड रस्ता, पुणे येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुनीता कुलकर्णी यांनी त्यांच्या सासर्‍यांच्या १३ व्या दिवशीचा विधी झाल्यावर नातेवाइकांना भेट देण्यासाठी सनातनचे ‘दत्त’, ‘मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म’ आणि ‘देवीपूजनाचे शास्त्र’ हे लघुग्रंथ विकत घेतले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘माझे सासरे पुष्कळ साधना करत होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्हाला नातेवाइकांना ग्रंथाची चांगली भेट देता आली.’’

१ उ. सनातन संस्था पुष्कळ चांगले धर्मकार्य करत असून नवरात्रीच्या कालावधीत ज्या महिला देवीची ओटी भरतील, त्यांना प्रसाद स्वरूपात ग्रंथ भेट देणार असल्याचे मंदिरातील पुजारी श्री. नारायण वझुरकर यांनी सांगणे : मोरवाडीत मोरजाई मंदिर असून या मंदिरातील पुजारी श्री. नारायण वझुरकर यांना भेटल्यानंतर ते म्हणाले, ‘‘सनातन संस्था पुष्कळ चांगले धर्मकार्य करते. त्यामुळे या धर्मकार्यात फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात माझाही सहभाग व्हावा; म्हणून मी ‘देवपूजनाचे शास्त्र’ या लघु ग्रंथाच्या प्रती घेत आहे. मंदिरात ज्या महिला नवरात्रीच्या कालावधीत देवीची ओटी भरतील, त्यांना हे ग्रंथ मी प्रसाद स्वरूपात भेट देणार आहे. त्यामुळे त्यांनाही हे ज्ञान मिळेल. मी या ग्रंथातील माहिती जाणून घेऊन जिथे जाईन तिथे या ग्रंथातील माहिती सांगून धर्मप्रसार करीन.’’

– सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२४.१०.२०२१)

२. गोवा

समाजाला आवश्यक असलेल्या विषयांवर सनातन संस्थेने ग्रंथ लिहिले असून समाजाला त्याची पुष्कळ आवश्यकता असल्याचे सांगणारे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक !

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक

गोवा येथील केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांना लहान मुले आणि विद्यार्थी यांना आवश्यक असलेले ग्रंथ दाखवले. ते पाहिल्यानंतर त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांनी स्वतःसाठी ग्रंथांचे २ संच विकत घेतले. या वेळी ते म्हणाले, ‘‘समाजाला आवश्यक असलेल्या सर्वच विषयांवर सनातन संस्थेने ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांची समाजाला पुष्कळ आवश्यकता आहे. तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात. मी माझ्या परीने हे ग्रंथ समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन.’’ त्यांचा २०० शाळांमध्ये ग्रंथांचा संच देण्याचा मानस असून प्रत्येक मासामध्ये २५ शाळांमध्ये संच देण्यास त्यांनी सुचवले आहे. त्यांनी पुढे सांगितले, ‘‘माझ्यावतीने लवकरात लवकर हे संच शाळांना भेट द्या.’’

– सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (२४.१०.२०२१)

३. देहली

अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेव

आरंभी सनातनच्या ग्रंथांविषयी नकारात्मक बोलणार्‍या व्यक्तीने ग्रंथ हातात घेतल्यावर ग्रंथांची मागणी करणे आणि त्या वेळी साधिकेला ग्रंथांतील चैतन्याची जाणीव होणे

‘एकदा मी आमच्या घरासमोरील शिवमंदिरातील पुजार्‍यांना सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांविषयी सांगितले. तेव्हा आरंभी ते नकारात्मक होते. ते म्हणाले, ‘‘हे ग्रंथ कुणी वाचत नाही.’’ त्यानंतर मी त्यांच्या हातात ग्रंथ दिले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही किती चांगले कार्य करत आहात ! मला १० ग्रंथ द्या.’’

त्यांचे बोलणे ऐकून ‘आम्हाला केवळ ग्रंथ घेऊन जायचे आहे आणि पुढचे सर्व कार्य हे ग्रंथ स्वतःच करणार आहेत, अशी गुरुदेवांनी मला जाणीव करवून दिली’, असे मला वाटले.’ – अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेव, मालवीय नगर, नवी देहली. (११.१०.२०२१)

‘शब्दजन्य ज्ञान बुद्धीने ग्रहण करू शकतो; परंतु परात्पर गुरूंची ज्ञानशक्ती बुद्धीअगम्य आहे; म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे असून ती शब्दातीत कार्य करत आहे. सनातनच्या ग्रंथांचे जे अध्ययन करतात, त्यांना या ग्रंथांतील ज्ञान आणि चैतन्य यांचा लाभ होऊन त्यांचे साधनेचे पुढील मार्गक्रमणही शीघ्र गतीने होते. सनातनचे ग्रंथ म्हणजे कलियुगातील भगवद्गीता आहे.’ – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था, कर्नाटक राज्य.

(क्रमशः पुढच्या रविवारी)