माजी पोप बेनेडिक्ट यांनी पाद्य्रांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही ! – जर्मनातील विधी आस्थापनाचा आरोप

  • पाद्य्रांकडून गेली अनेक दशके बालकांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे  आरोप होत असून या प्रकरणी पूर्वीच्या पोप यांनी क्षमायाचनाही केली आहे, तसेच संबंधितांना कोट्यवधी रुपयांची हानी भरपाईही देण्यात आली आहे. तरीही या घटना अद्याप न थांबण्यामागे ‘पाद्य्रांवर कठोर कारवाई न केली जाणे’, हेच मुख्य कारण आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक
  • विशेष नियमामुळे पाद्य्रांविरुद्ध गुन्हा नोंदवला जात नसल्याने त्यांचे फावते आहे. हा विशेष नियम हटवण्यासाठी आता व्हॅटिकनवर लोकांनी दबाव निर्माण करून पाद्य्रांना कारागृहात डांबण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक
माजी पोप बेनेडिक्ट

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीतील एका विधी आस्थापनाने माजी पोप बेनेडिक्ट यांच्यावर लैंगिक शोषणाच्या ४ प्रकरणांत संबंधितांवर योग्य कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. ही प्रकरणे वर्ष १९७० ते १९८० या काळातील आहेत. त्या वेळी बेनेडिक्ट म्युनिच शहराचे आर्चबिशप (शहराचे मुख्य पाद्री) होते. या आस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या या प्रकरणांच्या अहवालामध्ये बेनेडिक्ट यांचाही जबाब (म्हणणे) देण्यात आला आहे. त्यांनी यात त्यांच्यावरील आरोप फेटाळत ‘यात माझी कोणतीही चुकी नव्हती’, असे म्हटले आहे.

वर्ष १९७७ ते १९८२ या काळात म्युनिचचे आर्चबिशप असतांना बेनेडिक्ट यांनी पीटर हुलर्मन नावाच्या एका पाद्य्राचे एसेन शहरातून म्युनिच येथे स्थानांतर केले होते. एसेन येथे या पाद्य्रावर ११ वर्षांच्या मुलाशी चुकीचे वर्तन केल्याचा आरोप होता. पीटर याच्यावर आरोप असतांना त्याला दुसरीकडे दायित्व देण्यात आले होते. वर्ष १९८६ मध्ये पीटर यास लहान मुलांचा लैंगिक छळ केल्यावरून दोषी ठरवले जाऊन त्यास कारावासाची शिक्षाही झाली होती. दोषी ठरल्यानंतरही तो पुढे काही वर्षे बेनेडिक्ट यांच्यामुळे मुलांसमवेत काम करत होता आणि चर्चने त्याकडे दुर्लक्ष केले होते, असे सांगितले जात आहे.

वर्ष १९४६ ते २०१६ या कालावधीत पाद्य्रांकडून ३ सहस्र ६७७ मुलांचे लैंगिक शोषण !

वर्ष २०१८ मध्ये जर्मनमधील बिशपच्या संमेलनात सांगण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या निष्कर्षामध्ये ‘जर्मनीतील १ सहस्र ६७० पाद्य्रांकडून वर्ष १९४६ ते २०१४ या कालावधीत ३ सहस्र ६७७ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.  पीडितांची संख्या याहून अधिक असू शकते’, असे सांगण्यात आले होते.

म्युनिचचे सध्याचे आर्चबिशप कार्डिनल रेनहार्ड मार्क्स यांनी गेल्या वर्षी पोप फ्रान्सिस यांना बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांवर कारवाई करण्यास अपयशी ठरल्याचे सांगत पदत्याग करण्याची मागणी केली होती; मात्र पोप यांनी ती फेटाळून लावली होती.