नाशिक येथे शिरस्त्राण न घालणार्‍या वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई !

प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक – शहरात अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकीचालकांनी शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान करणे पोलीस आयुक्तांनी सक्तीचे केले आहे. विविध माध्यमांतून वाहनधारकांचे शिरस्त्राणाविषयी प्रबोधन करण्यात आले, तसेच शिरस्त्राण परिधान न केल्यास कारवाईला सामोरे जा, अशी चेतावणी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शिरस्त्राण नसलेल्या वाहनधारकांकडून थेट ५०० रुपये दंड आकारण्याची कारवाई २० जानेवारीपासून पोलिसांनी प्रारंभ केली आहे.

वाहनधारकांना शिरस्त्राणसक्ती करत ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’, अशी मोहीम वाहतूक पोलिसांकडून शहरात राबवण्यात आली, तसेच शिरस्त्राण नसलेल्या वाहनधारकांना शासकीय आणि खासगी कार्यालयांत प्रवेश नाकारण्यात आला आहे. दुसर्‍यांदा विनाशिरस्त्राण आढळल्यास थेट चालकांचा वाहनपरवाना रहित करण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी अचानकपणे पडताळणी मोहीम राबवत ही कारवाई करण्यात येणार आहे.