कल्याण येथील श्री मलंगगडावर श्री मलंगनाथांच्या जयघोषात शाकंभरी पौर्णिमा साजरी !

ठाणे, १९ जानेवारी (वार्ता.) – कल्याणजवळील श्री मलंगगडावर मोठ्या उत्साहात प्रत्येक पौर्णिमा प्रथा-परंपरा पद्धतीने साजरी केली जाते. १७ जानेवारी या दिवशी शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त कल्याणमधील श्री स्वामी समर्थ मठाचे धारकरी आणि मठाचे मठाधिश्वर पू. मोडक महाराज यांनी मलंगगडावर प्रदक्षिणा घालत श्री मलंगनाथांचा जयघोष केला. शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त कल्याणमधील श्री स्वामी समर्थ मठाचे धारकरी हे प्रतीवर्षी मोठ्या संख्येने मलंगगडावर येतात; मात्र यंदा कोरोना महामारीमुळे निवडक धारकरी आणि विश्व हिंदु परिषदेचे कल्याण जिल्हा सुरक्षा प्रमुख राजेश गायकर, सुरेंद्र भालेकर यांच्या उपस्थितीत शाकंभरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

श्री मलंगगडाचा इतिहास

श्री मलंगगडावर नाथपंथाची दीक्षा गादी आहे. तेथे हिंदु धर्मीय दर्शनासाठी जातात. होळी पौर्णिमेला आरती करतात. या मुख्य स्थानापासून अलीकडे जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या २ समाधी आहेत. याच गडावर नाथपंथाचे श्री मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे, तसेच अन्य ५ नाथांच्या समाधीही आहेत. याच गडावर श्री गणेश, श्री हनुमान आणि देवी यांचे मंदिरही आहे. सध्या ही दीक्षा गादी आणि २ समाधीस्थळे यांवर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे. पेशव्यांनी येथे पूजापाठ करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असणार्‍या केतकर घराण्याकडे दिला. पूर्वापार पिढ्यान्पिढ्या हा वारसा केतकर घराण्याच्या पुढील पिढीकडे हस्तांतरित होत आहे. आजही येथे सर्व धार्मिक विधी हिंदु धर्माप्रमाणे होतात.