संभाजीनगर येथील १५ खासगी प्रयोगशाळांना महापालिकेच्या नोटिसा !

अँटिजेन चाचणीस प्रयोगशाळांची टाळाटाळ !

संभाजीनगर – शहरातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी प्रयोगशाळांनी महापालिकेकडून अँटिजेन आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी करण्यासाठी ३९ प्रयोगशाळांनी अनुमती मागितली होती; मात्र त्यातील १५ प्रयोगशाळांच्या वतीने एकही अँटिजेन आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून १५ प्रयोगशाळांना ‘प्रयोगशाळांची अनुमती का रहित केली जाऊ नये’, अशी विचारणा करत ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी १७ जानेवारी या दिवशी दिली.

काय आहे नेमके कारण ?

राज्यातील एन्.ए.बी.एल्. आणि आय.सी.एम्.आर्. मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आर्.टी.पी.सी.आर्. पडताळणीसाठी कमाल विक्री मूल्य निश्चित करण्याविषयी ६ डिसेंबर २०२१ या दिवशी शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयानुसार शहरातील ३९ खासगी प्रयोगशाळा चालकांनी अँटिजेन आणि आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्यासाठी महापालिकेकडून अनुमती घेतली. त्यासाठी रुग्ण स्वतःहून प्रयोगशाळेत पडताळणीसाठी आल्यास १०० रुपये, पडताळणी केंद्रावरून नमुने घेतल्यास १५० रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन पडताळणीसाठी नमुने घेतल्यास २५० रुपये शुल्क आकारण्याची सूचना महापालिकेने केली; मात्र अनमुती घेतल्यानंतरही खासगी प्रयोगशाळा चालकांकडून अँटिजेन आणि आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्यासाठी टाळाटाळ केल्याने ही कारवाई करण्यात आली.