श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कांचीपुरम् येथील कांचीपिठाच्या शंकराचार्यांचे भक्त श्री. राजगोपालन् आणि त्यांच्या मातोश्री यांची घेतलेली भेट !

कांचीपिठाचे शंकराचार्य श्रीजयेंद्र सरस्वती यांचे गुरु श्रीचंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची श्री. राजगोपालन् यांनी पाद्यपूजा करणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘मी आश्रमात एक सेवक आहे. माझी पाद्यपूजा करू नका’, असे सांगितल्यावर श्री. राजगोपालन् यांनी ‘पाद्यपूजा करणे ही आमची परंपरा आहे’, असे सांगणे : ‘१२.२.२०२१ या दिवशी आम्ही महर्षींनी सांगितल्याप्रमाणे कांचीपुरम् येथील मंदिरात दर्शन घेऊन चेन्नईला परत येतांना वाटेत श्री. राजगोपालन् नावाच्या एका लेखापरीक्षकांकडे (‘ऑडिटर’कडे) गेलो. होसूर येथे रहाणारे श्री. सुभाष यांनी आम्हाला श्री. राजगोपालन् यांना भेटण्यास सांगितले होते. श्री. राजगोपालन् यांच्याकडे गेल्यानंतर ‘ते कांचीपुरम् येथील कांचीपिठाच्या शंकराचार्यांचे भक्त आहेत’, असे आम्हाला कळले. ‘मी सद्गुरु आहे’, हे त्यांना श्री. सुभाष यांच्याकडून आधीच समजल्यामुळे त्यांनी माझ्या पाद्यपूजेची सिद्धता करून ठेवली होती. त्यांना मी म्हणाले, ‘‘मी आश्रमातील एक सेवक आहे. माझी पाद्यपूजा करू नका’’, तरीही त्यांनी ऐकले नाही. ते म्हणाले, ‘‘पाद्यपूजेला ‘नाही’ म्हणू नका. ती आमची परंपरा आहे.’’ त्यांनी माझी पाद्यपूजा केली.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे औक्षण करतांना श्री. राजगोपालन् यांच्या मातोश्री आणि शेजारी श्री. राजगोपालन्

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे पाद्यपूजा होत असतांना शिष्यभावात रहाता येणे : मी पाद्यपूजेच्या वेळी मनात गुरुदेवांचे स्मरण करत होते आणि जे होईल, त्याकडे साक्षीभावाने पहात होते. गुरुदेवांनी आपल्याला कोणत्याही स्थितीत सहजभावात रहाण्याची शिकवण दिलेली असल्याने मला काहीच वाटले नाही. ‘त्यांच्या परंपरेत पाद्यपूजा कशी करतात ?’, हे मला शिकता आल्याने त्या वेळी मलाही शिष्यभावात रहाता आले. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) नेहमी म्हणतात, ‘‘आपण सतत शिष्यभावात रहायला हवे, म्हणजे आपल्याला कोणत्याच गोष्टीचा अहंकार होत नाही.’’

१ इ. पाद्यपूजा चालू असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना काशायवस्त्र (भगवे वस्त्र) परिधान केलेले यती (संन्यासी) दिसणे आणि नंतर यतीश्राद्धाविषयी श्री. राजगोपालन् यांनी सांगितल्यावर त्यांना झालेल्या यतीदर्शनाचा उलगडा होणे : पाद्यपूजा चालू असतांना अकस्मात् मला ५ – ६ यती (संन्यासी) घरातून अंतराळी एका दारातून दुसर्‍या दाराकडे निघून गेल्याचे जाणवले. त्यांनी काशायवस्त्र (भगवे वस्त्र) परिधान केले होते. मला वाटले, ‘खरंच ! कुठल्या तरी सिद्धांचा आपल्या कार्याला मिळालेला हा आशीर्वादच आहे.’ ते यती मला मधूनच प्रकाशरूपात दिसत होते. काही वेळाने श्री. राजगोपालन् यांनी आम्हाला सांगितले, ‘‘कांचीपिठाचे आताचे शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांनी आम्हाला महालय श्राद्धपक्षातील द्वादशीला येणार्‍या यतीश्राद्धाच्या दिवशी यतींचे श्राद्ध करण्यास सांगितले असल्याने आम्ही ते प्रतिवर्षी करतो.’’ त्या वेळी ‘मला यतीदर्शन का झाले ?’, याचा उलगडा झाला.

२. वास्तूत पूर्वजांचा त्रास जाणवणे

पाद्यपूजा झाल्यानंतर मी तेथील आसंदीवर जाऊन बसले. त्याच वेळी माझ्या मागे असलेल्या भिंतीवर लावलेले श्री. राजगोपालन् यांच्या वडिलांचे छायाचित्र धाडकन खाली पडले. मला त्यांच्या वास्तूत पूर्वजांचा त्रास जाणवला. त्यासाठी मी त्यांना नामजपादी उपाय करायला सांगितले.

३. श्री. राजगोपालन् यांच्या घरी महास्वामींच्या (कांचीपिठाचे शंकराचार्य श्रीजयेंद्र सरस्वती यांचे गुरु श्रीचंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या) चरणपादुका आहेत. आम्ही त्यांच्या देवघरातील देवता आणि पादुका यांचे दर्शन घेतले.

४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री. राजगोपालन् यांच्या घरी ‘इंद्राक्षी होम’ करणे

इंद्राक्षी होम करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्री. राजगोपालन् यांच्या मातोश्रींनी मला सांगितले, ‘‘महास्वामींनी माझ्या स्वप्नात येऊन ‘तू घरात देवीचे हवन चालू कर’, असा दृष्टांत दिला.’’ त्यांना श्री. सुभाष यांनी सांगितले होते, ‘‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे मी (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ आणि ‘इंद्राक्षी होम’ करते.’’ त्यामुळे श्री. राजगोपालन् यांच्या मातोश्रींनी मला सांगितले, ‘‘आज तुम्ही आमच्या घरी ‘इंद्राक्षी होम’ करा.’’ तेव्हा मला वाटले, ‘जणूकाही मला महास्वामींनीच होम करण्याची आज्ञा दिली आहे.’ त्या दिवशी ‘विश्व अग्निहोत्र दिन’ होता. मला सेवेमुळे सकाळी ‘अग्निहोत्र’ करणे शक्य झाले नव्हते. त्या दिवशी गुरूंनी ते कर्मही माझ्याकडून पूर्ण करवून घेतले. श्री. राजगोपालन् यांच्या घरी मी ‘इंद्राक्षी होम’ केल्यामुळे त्यांनाही पुष्कळ आनंद झाला. ‘परेच्छेने वागण्यात आणि दुसर्‍यांना आनंद देण्यात किती आनंद असतो !’, हे आम्ही अनुभवले.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१७.३.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक