‘राजधानी सातारा’ची अस्मिता असणार्‍या अजिंक्यतारा गडावरील निकृष्ट प्रतीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत ! – शिवसेना

सातारा, १७ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अजिंक्यतारा गडावर विविध विकासकामे चालू आहेत; मात्र ही कामे निकृष्ट प्रतीची झाली आहेत. ‘राजधानी सातारा’ची अस्मिता असणार्‍या अजिंक्यतारा येथील निकृष्ट प्रतीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत, अशी चेतावणी शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी दिली आहे.

नीलेश मोरे म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अजिंक्यतारा येथे जाणार्‍या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या रस्त्याच्या बाजूला असणारे गटाराचे काम चालू आहे; मात्र हे काम अत्यंत निकृष्ट प्रतीचे होत आहे, अशा तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. या तक्रारीची नोंद घेत शिवसैनिकांनी कामाची पडताळणी केली. तेव्हा गटाराचे काम निकृष्ट प्रतीचे झाले असल्याचे निदर्शनास आले. गटाराच्या बांधकामामध्ये केवळ सिमेंट आहे; परंतु त्यामध्ये लोखंडी गज नसल्याचे आढळून आले. लोकप्रतिनिधी केवळ निधी संमत करतात, तर ठेकेदार कामावर फिरकत नाहीत. त्यामुळे सर्व कामे निकृष्ट प्रतीची होत आहेत. संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या सूचीत घालून या कामाची फेरनिविदा काढण्यात यावी.