नवी मुंबई – गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उरणच्या समुद्रात डिझेलची तस्करी करणार्या ५ जणांना अटक केली आहे. या आरोपींनी २ जहाजांमध्ये अनधिकृतपणे साठा केलेले २१ सहस्र ४७० लिटर डिझेल कह्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांना समुद्रात डिझेलची तस्करी चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी आणि मुंबई पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यासह उरणच्या करंजाडे खाडीतील २ जहाजांवर कारवाई केली. या आरोपींनी ९ सहस्र ३०० लिटर डिझेल बेकायदेशीरपणे विकून जमा केलेले ६ लाख ८५ सहस्र रुपये पोलिसांनी कह्यात घेतले. आरोपी समुद्रातील विदेशी व्यावसायिक जहाजांवरील खलाशांकडून ६० रुपये प्रतिलिटर दराने डिझेल खरेदी करत होते. त्यानंतर हेच डिझेल जहाजावरील मत्स्य व्यवसायिकांना प्रतिलिटर ७३ ते ७५ रुपयांना विकत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (कायद्याचा धाक नसल्याचा परिणाम ! – संपादक)