देवीहसोळ, रत्नागिरी येथील सनातनचे संत पू. जनार्दन वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही वैशिष्ट्ये !

देवीहसोळ, जिल्हा रत्नागिरी येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली काही वैशिष्ट्ये !

पौष कृष्ण पक्ष पंचमी (२३.१.२०२२) या दिवशी पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना १०० वर्षे पूर्ण होत आहेत. उद्या १८.१.२०२२ या दिवशी देवीहसोळ, जिल्हा रत्नागिरी येथे त्यांच्या निवासस्थानी महामृत्युंजय याग करण्यात येणार आहे. त्या वेळी त्यांची गुळाने तुला करण्यात येईल आणि पाच सुवासिनी कणकेच्या १०० दिव्यांनी त्यांचे औक्षण करतील. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

पू. जनार्दन वागळेआजोबा

पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना शताब्दीपूर्तीनिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शिरसाष्टांग नमस्कार !

श्री. पुरुषोत्तम वागळे, रत्नागिरी (पुतण्या)

श्री. पुरुषोत्तम वागळे

१. प्रीती

१ अ. पू. जर्नादन वागळेआजोबांनी गावातील लोकांना साहाय्य करून प्रेमाने जोडून ठेवणे : ‘पू. जनार्दन वागळेआजोबा यांचे सर्व आयुष्य खेडेगावात गेले. त्यांनी गावातील लोकांना प्रेम देऊन जोडून ठेवले आहे. ‘अडलेल्यांना साहाय्य करणे’, हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे त्यांच्यावर फार प्रेम आहे.

१ आ. गावातील लोकांशी जवळीक असणे : पू. आजोबा अलीकडे वयोमानानुसार त्यांची मुलगी सौ. संगीता लोटलीकर हिच्याकडे अधूनमधून वास्तव्याला असतात. गावातील कुणीही भेटले, तरी ते प्रथम मला विचारतात, ‘‘पू. आजोबा (तात्या) कसे आहेत ?’’ पू. आजोबांना कुणी बर्‍याच दिवसांनी भेटले, तर ते त्याला प्रेमाने मिठी मारतात.

२. बालकभाव

दीड वर्षांपूर्वी पू. आजोबा रुग्णाईत असल्याने त्यांना रत्नागिरीला आमच्या घरी आणले होते. तेव्हा त्यांना अंघोळ घालावी लागे. ती सेवा मी करत होतो; परंतु पू. आजोबांचे ‘मला त्रास होणार नाही’, याकडे लक्ष असायचे. त्यांच्या डोक्यावरील केस मऊ आहेत. त्यामुळे त्यांना अंघोळ घालतांना त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतांना ‘लहान मुलालाच अंघोळ घालत आहे’, असे मला वाटायचे. अंघोळीच्या वेळी ते संपूर्ण अंग चोळून घेत असत. तेव्हा मला त्यांच्यातील बालकभाव जाणवला.’

सौ. पुष्पलता पुरुषोत्तम वागळे, रत्नागिरी (चुलत सून, पुतण्याची पत्नी)

सौ. पुष्पलता वागळे

१. प्रेमभाव

‘पू. आजोबांच्या जेवणात आवडीचा पदार्थ असला, तर ते त्या पदार्थाची स्तुती करतात आणि समवेत बसलेल्या नातवांना ‘भरपूर खा, छान झाला आहे’, असे सांगतात. ‘सगळ्यांनी पोटभर जेवावे’, असे त्यांना वाटते.

२. समष्टी सेवेची तळमळ

पू. आजोबा रत्नागिरी जिल्ह्यात आणि बाहेरगावी साधकांसाठी नामजप करण्यासाठी जात असत. या वयातही त्यांनी ही सेवा तळमळीने आणि उत्साहाने केली.’

सौ. स्नेहलता भास्कर वागळे (सून, मुलाची पत्नी), देवीहसोळ, जिल्हा रत्नागिरी

सौ. स्नेहलता वागळे

१. अपेक्षा न करणे

‘पू. आजोबांचे लहानपणापासूनचे जीवन कष्टात गेले आहे, तरी त्यांनी कुणाकडून फार अपेक्षा केल्या नाहीत.

२. मायेची आसक्ती नसणे

पू. आजोबा नेहमी मला म्हणतात, ‘‘दिसते, ते माझे नव्हे, सर्व लोकांचे आहे’’, म्हणजे ‘माझे काहीच नाही !’

३. साधनेसाठी प्रोत्साहन देणे

पू. आजोबा मला नेहमी म्हणतात, ‘‘प.पू. गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) विश्वास ठेव. त्यांनी सांगितलेली साधना कर. मुलांमध्ये अडकू नको. मुलांचे सर्व फक्त कर्तव्यभावाने करायचे.’’

४. घरातील गाई-म्हशींची पुष्कळ काळजी घेणे

त्यांचे प्राण्यांवरही फार प्रेम होते. ८० वर्षांचे होईपर्यंत त्यांनी गाई-म्हशींना खायला-प्यायला दिले आणि त्याचप्रमाणे जनावरे रुग्णाईत असतांना त्यांना औषधपाणीही केले.

५. साधनेमुळे स्वभावात पालट होणे

पूर्वी पू. आजोबांचा स्वभाव कडक होता. मला त्यांच्यासमोर उभे रहाण्याचीही भीती वाटायची; पण त्यांनी साधनेला आरंभ केल्यावर त्यांच्यात पालट झाला.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करण्याची तळमळ असलेले आणि त्यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले पू. जनार्दन वागळेआजोबा !

‘पू. जनार्दन वागळेआजोबा हे माझे आजोबा (आईचे, सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिचे वडील) आहेत. पू. आजोबांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. प्रियांका गाडगीळ

१. आज्ञापालन करण्याच्या तीव्र तळमळीमुळे उतारवयातही साधकांसाठी ७ – ८ घंटे नामजप करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजोबांना साधकांसाठी नामजप करायला सांगितले होते. कोरोनाच्या कालावधीत देश-विदेशांतील अनेक साधक रुग्णाईत होते. पू. आजोबा या वयातही साधकांसाठी ७ – ८ घंटे नामजप करत असत. पू. आजोबांची कधी कधी पाठ दुखायची, तरीही ते कधी चिकाटीने बसून, तर कधी झोपून साधकांसाठी नामजप करत असत. त्यांच्या मनात सातत्याने ‘मी आज्ञापालन करण्यात न्यून पडायला नको’, असा भाव असे.

२. साधकांप्रती वात्सल्यभाव

पू. आजोबा ज्या साधकांसाठी नामजप करत असत, ‘त्या साधकांना बरे वाटले का ? त्यांची प्रकृती आता ठीक आहे ना !’, असे ते आवर्जून विचारतात. त्यांचे साधकांप्रती असलेले प्रेम आणि वात्सल्य पाहून माझी भावजागृती होत असे.

३. पू. आजोबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना ‘जणू एखादे लहान मूल त्याच्या आईला सांगत आहे’, असे वाटणे

पू. आजोबांच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी पू. आजोबांच्या डोळ्यांत परात्पर गुरु डॉक्टरांप्रती बालकभाव जाणवत होता. त्या वेळी पू. आजोबांचे बोलणे अगदी बालकाप्रमाणे होते. ‘जणू एखादे लहान मूल त्याच्या आईला सांगत आहे’, असे मला वाटत होते.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा

पू. आजोबा नेहमी म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाविना मला या जगात अन्य काही नको. ते जे सांगतील, ते मी करीन.’’ परात्पर गुरु डॉक्टर त्यांचे सर्वेसर्वा आहेत. पू. आजोबांच्या बोलण्यातून त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीची श्रद्धा दिसून येते.

४ अ. ‘पू. आजोबा परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात बोलत असतांना मध्येच कधीतरी ते शून्यात पहात आहेत’, असे जाणवते.

असे आदर्श पू. आजोबा मला लाभले. ‘त्यांच्यातील चैतन्याचा आम्हा सर्वांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होवो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’

– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर, पू. वागळे आजोबांची नात), (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) डोंबिवली (९.१.२०२२)