नागपूर येथे भाजीपाला आणि कापसाचे पीक यांना गारपिटीचा फटका !

पालकमंत्र्यांचे पंचनामे करण्याचे आदेश

विदर्भात जोरदार गारपीट

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जोरदार गारपीट चालू आहे. त्यामुळे शेतीची पुष्कळ प्रमाणात हानी होत आहे. नागपूर परिसरातील भाजीपाला आणि कापूस या पिकांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे पिकांची नेमकी किती हानी झाली आहे याच्या पहाणीसाठी सर्वेक्षण केले जात आहे, असे कृषी विभागाचे अधिकारी पंकज लोखंडे यांनी १४ जानेवारी या दिवशी सांगितले. गेल्या २ दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे झालेल्या हानीचे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले आहेत.

गारपिटीमुळे ११ एकर क्षेत्रांवरील भाजीपाला पिकांची हानी झाली आहे. अधिकारी सर्वेक्षण करत आहेत, अशी माहिती शेतकरी गजानन ठाकरे यांनी दिली. जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागवण्यात आला आहे. महसूल विभागाच्या पद्धतीनुसार हानीचे पंचनामे केले जाणार असून तात्काळ साहाय्य देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. शेतकर्‍यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा, असे कृषीमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आर्. विमला यांनी महसूल यंत्रणेला पिकांच्या हानी संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रामटेक, सावनेर, नागपूर ग्रामीण, कामठी, पारशिवनी या तालुक्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटी यांमुळे पिकांची प्रचंड हानी झाली आहे. नागपूर जिल्ह्यात जवळपास ७ सहस्र ४३१ हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला आणि फळपिके यांची हानी झाली आहे. ८ सहस्र ३३४ शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाने सर्वाधिक फटका तूरडाळीच्या पिकाला बसला असून दीड सहस्र हेक्टरमधील पिकाची हानी झाली आहे.