शुल्वसूत्रे (वैदिक गणित)

आजच्या विज्ञान युगाचा पाया वेदांमध्ये सापडतो. गणिताचे ज्ञान शुल्वसूत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सूत्रात सामावलेले आहे. ‘शुल्व’ या शब्दाचा अर्थ आहे ‘दोरी.’ अर्थात या ठिकाणी मोजमाप करण्याची दोरी असा त्याचा अर्थ आहे. ‘शुल्वसूत्रे’ ही जगातील सर्वांत प्राचीन गणिताची नियमावली आहे. या नियमावलीलाच ‘वैदिक गणित’ म्हटले जाते.

१. अमेरिकन गणिततज्ञ आणि विज्ञानाचे इतिहासकार ‘सायडेन बर्ग’

अमेरिकन गणिततज्ञ आणि विज्ञानाचे इतिहासकार ‘सायडेन बर्ग’ यांनी दाखवून दिले आहे की, सर्व प्राचीन गणितशास्त्र शुल्वसूत्रातून निघालेले आहे. वैदिक यज्ञवेदी बांधण्यासाठी जे नियम आहेत, ते बांधकाम शास्त्रामधील आवश्यक नियम आहेत. वर्तुळ, निरनिराळ्या आकाराचे त्रिकोण आणि चौकोन इत्यादी सर्व प्रकारच्या आकृत्यांचे नियम या सूत्रात सापडतात.

२. बोधायन

काटकोनाचे प्रमेय मांडणारा ग्रीक गणिततज्ञ ‘पायथागोरस’ याच्या आधी ‘बोधायना’ने तोच सिद्धांत सूत्ररूपात प्रथम मांडला. बर्क नावाचा विद्वान सांगतो की, ‘पायथागोरस’च्या पूर्वी २०० वर्षे ‘बोधायना’ने हा सिद्धांत मांडला. ग्रीक इतिहासकार ‘पायथागोरस’ला ‘ब्राह्मणाचा शिष्य’ म्हणतात. शुल्वसूत्रातील गणितात विटा सिद्ध करण्याच्या अत्यंत प्रगल्भ अशा तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

३. आइन्स्टाईन

० ते ९ हे अंक वेदांनी जगाला दिलेली देणगी आहे. ‘आइन्स्टाईन’ हा विश्वविख्यात शास्त्रज्ञ सांगतो, ‘‘भारतियांनी आपल्याला मोजायला शिकवले, त्यासाठी आपण त्यांचे अत्यंत ऋणी आहोत.’’

(साभार : ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक, नोव्हेंंबर-डिसेंबर २०११)