१. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना
१ अ. आई-वडिलांनी चांगले संस्कार केल्याने देवाप्रती भाव वाढणे : ‘माझे आई-वडील पुष्कळ साधे आणि सरळ मनाचे होते. त्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केल्यामुळे माझा देवाप्रती भाव वाढला. मला बाबांनी शिक्षणासाठी ठाणे येथे आणले. माझे बाबा लोअर परेल, मुंबई येथे एका कापडाच्या गिरणीत कामाला होते. बाबांना घरसंसार चालवणे कठीण जायचे. आम्ही देवावर विश्वास ठेवून जीवन कंठीत होतो. माझी देवावर फार श्रद्धा होती.
१ आ. पूजा करतांना ‘श्रीकृष्ण पहात आहे’, असे साधिकेला जाणवणे : मला लहानपणापासून देवाधर्माची फार आवड आहे. मी देवळात जाणे, स्तोत्र म्हणणे, उपवास करणे आणि संकष्टी चतुर्थी करणे, यांसारखी व्रतवैकल्ये लहानपणापासून करत होते. पूजा करतांना ‘श्रीकृष्ण मला पहात आहे’, अशी मला अनुभूती यायची. मी लहानपणी गीतापाठ वाचायचे. मी देवळात जायचे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायचे.
२. सनातन संस्थेशी संपर्क
२ अ. वर्ष १९९३ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ करणे आणि गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाशीर्वादाने साधनेत असल्यामुळे सुख, शांती अन् आनंद अनुभवणे : डिसेंबर १९७७ मध्ये माझा श्री. आनंद साखळकर यांच्याशी विवाह झाला आणि मी गोव्याला आले. त्याच वर्षी मला वास्कोला ‘एम्.पी.टी.’ रुग्णालयात नोकरी लागली. वर्ष १९९३ मध्ये श्री. प्रकाश जोशी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही (मी आणि यजमान) साधना चालू केली. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे भंडारे असायचे आणि ते त्यांत भजने म्हणायचे. आम्ही दोघेही नोकरी सांभाळून भजने, भंडारे आणि सत्संग यांसाठी जायचो. एकदा साधकांनी ‘एम्.पी.टी.’ सभागृहात गुरुदेवांचे प्रवचन आयोजित केले होते. त्या वेळी सर्व साधकांना सेवा मिळाली. गुरुदेवांनी आम्हाला साधनेविषयी मार्गदर्शन केले. आज आम्ही गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने साधनेत असल्यामुळे सुख, आनंद आणि शांती अनुभवत आहोत.
२ आ. गोवा येथील गुरुपौर्णिमेच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला मिळाल्याने आनंदाची अनुभूती येणे : वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा रामनाथी देवस्थान, फोंडा, गोवा येथे झाली. त्या वेळी आम्ही (मी, डॉ. ज्योती पंचवाडकर आणि सौ. रजनी काकोडकर) वास्कोहून गुरुपौर्णिमा सोहळ्याला आलो होतो. आम्हाला तिथे सेवा मिळाली. आम्हा सर्वांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला मिळाल्याने आनंदाची अनुभूती घेता आली.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाच्या सेवेत खंड न पडणे आणि गुरुमाऊलींनी ‘अध्यात्म अन् संसार या दोन्हींची सांगड कशी घालायची ?’, ते शिकवणे
आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा मिळाली. आम्ही वास्को येथे घरोघरी जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत होतो. आम्ही प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे १०० अंक वितरण करून नोकरीला जायचो. माझे यजमान दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, विज्ञापने मिळवणे आदी सेवा करायचे. तेव्हापासून आजपर्यंत गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने आमच्या सेवेत खंड पडला नाही. आम्हाला ‘गुरुमाऊलींनी अध्यात्म आणि संसार यांची सांगड कशी घालायची ?’, ते शिकवले. ते आम्ही अनुभवत आहोत.
४. अनेक कठीण प्रसंगात गुरूंची कृपा अनुभवणे
माझ्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले. गुरुमाऊलींच्या कृपेने मला त्या सर्वांवर मात करता आली. माझे ३ वेळा अपघात झाले. त्या प्रत्येक वेळी गुरुमाऊलींनी माझ्या त्रासाची तीव्रता न्यून करून मला त्रास सहन करण्याची शक्ती दिली. त्या वेळी मी केवळ गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांचा धावा करत होते. गुरुदेवांनी मला त्यांतून सावरले. त्यांनी माझ्याकडून प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजपादी उपाय करवून घेतले.’
– सौ. शोभा आनंद साखळकर, वास्को, गोवा. (२३.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |