साधकाने अनुभवलेली श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांची रूपे !

‘९.५.२०२१ या दिवशी आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून दौर्‍यावर निघालो. या प्रवासात मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंमधील श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती आणि श्रीमहाकाली या तिन्ही देवीस्वरूपांचे दर्शन झाले. ती रूपे पाहून माझा भाव जागृत होत होता.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. प्रीतीस्वरूप श्री महालक्ष्मीचे रूप !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आम्हाला प्रवासात ‘सर्व व्यवस्थित आहे ना ? तुम्ही जेवलात ना ? काही त्रास होत नाही ना ?’, असे सर्व एवढ्या प्रेमाने विचारायच्या की, ‘जणूकाही गुरुदेवच आमची विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवायचे. त्यांच्या याच प्रीतीरूपात मला साक्षात् श्री महालक्ष्मीचे दर्शन घडले !

श्री. वाल्मिक भुकन

२. ज्ञानदायिनी श्री महासरस्वतीचे रूप !

प्रवासात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आम्हाला झाडे, फुले, पक्षी, डोंगर, नदी अशा अनेक गोष्टींविषयी पुष्कळ माहिती सांगतात. प्रवासात भजने लावल्यावर त्या आम्हाला त्याचा अर्थ सांगून म्हणतात, ‘‘भजने केवळ ऐकायची नाहीत, तर त्यांचा अर्थही समजला पाहिजे.’’ एखादा नवीन विषय असेल, तर सर्वांना शिकायला मिळावे; म्हणून आम्ही सर्व जण एकत्र बसलो असतांना त्या त्याविषयी आम्हाला माहिती सांगतात. त्या वेळी ‘आकाशातून एक प्रकाशाचा झोत त्यांच्याकडे येत आहे आणि त्या प्रकाशझोतातून ईश्वराने त्यांना दिलेले ज्ञान त्या आम्हाला सांगत आहेत’, असे मला जाणवायचे. या रूपात मला त्यांच्यामध्ये साक्षात् श्री महासरस्वतीचे दर्शन झाले !

३. श्री महाकालीचे रूप !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना प्रत्येक कृती सात्त्विक केलेली आवडते. त्या म्हणतात, ‘‘देवाने घातलेल्या नियमांच्या विरुद्ध जायचे नाही. त्या नियमांच्या विरुद्ध जाणार्‍यांना देव कधीही क्षमा करत नाही.’’ त्यांना भेटायला आलेली समाजातील एखादी स्त्री आचारधर्मानुसार वागत नसेल, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू तिला त्याची जाणीव करून देतात. त्यांच्या याच रूपात मला त्यांच्यात साक्षात् श्री महाकालीचे दर्शन झाले !’

– गुरुचरणसेवक, श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (९.९.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक