१. सरकारी कार्यालयात अथवा प्रवासात देव सतत समवेत असल्याचा अनुभव येत असल्याने ‘स्थुलातून कुणीतरी सोबत असावे’, अशी आवश्यकता न भासणे
‘महाविद्यालयीन शिक्षण चालू असतांनाच मी पूर्णवेळ साधना करू लागले. त्यामुळे मला बाहेरच्या जगाचा विशेष अनुभव नव्हता. मध्यंतरी काही गोष्टींसाठी मला सरकारी कार्यालयांत जावे लागायचे. त्या वेळी प्रतिकूल प्रसंग घडत असल्याने माझ्या मनाला त्रास व्हायचा; पण ‘यामुळे प्रारब्धभोग न्यून होऊन मी एक पाऊल देवाच्या जवळ जात आहे’, अशी जाणीव मनाच्या एका कोपर्यात असायची. कार्यालयातील व्यक्तींशी संपर्क आल्यावर त्यांचे एकमेकांबरोबर असलेले अयोग्य वागणे-बोलणे पाहून ‘देवाने आपल्याला किती चांगल्या वातावरणात ठेवले आहे’, ते लक्षात येऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त व्हायची. तेथे ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत’, असे मी अनुभवायचे. त्यामुळे कठीण प्रसंग आला, तरी मला भय किंवा ‘पुढे कसे होणार ?’, याची चिंता एक क्षणही वाटायची नाही. कधी कधी मला एकटीला
रात्रीचा लांबचा प्रवास करावा लागायचा. देवाच्या कृपेमुळे या प्रवासाचा मला कधीच त्रास झाला नाही किंवा कुठलीही अडचण आली नाही. एकदा मी बाहेर गेले असता तेथे मला एक ओळखीचे गृहस्थ भेटले आणि मला म्हणाले, ‘‘तुम्ही अशा ठिकाणी एकट्या येता, तर तुम्हाला भीती वाटत नाही का ? ‘कुणीतरी आपल्या समवेत असले, तर बरे’, असे तुम्हाला वाटत नाही का ?’’ त्या वेळी मी त्यांना ‘नाही’, असे सांगितले. खरेतर देवच सततचा सोबती असल्याने स्थुलातून कुणाच्या तरी सोबतीची मला आवश्यकताच भासायची नाही.
२. सरकारी कार्यालयातील अधिकारी बोलत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या सूक्ष्मातील अस्तित्वामुळे अधिकार्यांच्या शब्दांवरील त्रासदायक आवरण निघून जाऊन ते शब्द साधिकेपर्यंत पोचत असल्याने तिच्यावर शब्दांचा परिणाम न होणे
काही कामांसाठी मला सरकारी कार्यालयात जावे लागायचे. तेथील वातावरण माझ्यासाठी नवीन होते. तेथे मी बसत असलेल्या ठिकाणी नेहमी बाजूला एक आसंदी रिकामी ठेवलेली असायची. ती पाहून मला आनंद व्हायचा आणि ‘ती परात्पर गुरु डॉक्टरांसाठीच रिकामी ठेवली आहे’, असे वाटायचे. तेथील कुणीही अधिकारी माझ्या बाजूच्या आसंदीवर कधीच बसायचे नाहीत. माझ्या मागे अथवा समोर बसायचे. तेथील संबंधित व्यक्ती माझ्याशी बोलतांना कधी मोठ्याने रागावून, तर कधी अतिशय बौद्धिक स्तरावर बोलायच्या.
समोरची व्यक्ती माझ्याशी बोलू लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या सूक्ष्मातील अस्तित्वामुळे तिचे शब्द माझ्या दिशेने येत असतांना मधल्या काही क्षणांत त्या शब्दांवरील त्रासदायक आवरण नष्ट होऊन ते माझ्यापर्यंत पोचत. त्यामुळे माझ्या मनावर त्या शब्दांचा परिणाम होत नसे. त्या व्यक्तीशी बोलत असतांना ‘मी बोलत नसून देवच त्यांना उत्तरे देत आहे’, असे मला अनुभवायला यायचे. देवाला सतत अनुभवत असल्याने ‘तेथील रज-तमप्रधानयुक्त वातावरणात ६ – ७ घंटे बसूनही माझ्यावर कधी त्रासदायक शक्तीचे आवरण आले किंवा मला काही त्रास झाला’, असे कधी झाले नाही. तेथे ‘मी दुःखी आहे’, असे मला वरून दाखवावे लागायचे; परंतु आतून माझी आनंदाची स्थिती कायम असायची.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |