श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. अध्यात्माच्या मार्गाने जातांना दुसर्‍यांना आनंद दिल्यावर साधनेत प्रगती होते ! 

‘आतापर्यंत जगत आलेले मायेतील आयुष्य संपवून, सर्वसंगपरित्याग करून अध्यात्माच्या मार्गाने जातांना सतत दुसर्‍यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच साधनेत प्रगती होते. दुसर्‍यांना आनंद देता देता आपल्याला गुरुकृपेने केव्हा ‘सत्-चित्-आनंदाची अनुभूती येऊ लागते’, ते कळतही नाही.

२. साधनेतील प्राथमिक टप्प्यात स्त्रियांची प्रगती लवकर होते; परंतु ठराविक टप्प्यानंतर त्या मायेत अडकत असल्याने पुरुष संतांची संख्या अधिक असते !

स्त्रियांमध्ये भाव असल्याने साधनेतील प्राथमिक टप्प्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची प्रगती लवकर होते. नंतर पुरुष लवकर संत होतांना दिसून येतात; कारण स्त्रियांपेक्षा पुरुष मायेत अल्प प्रमाणात अडकलेले असतात. स्त्रीला तिचा नवरा, मुले-बाळे, नातवंडे या सर्वांविषयीचे विचार मायेत अडकवतात. त्यामुळे तिचा अध्यात्मात पुढे जाण्याचा वेग काही ठराविक टप्प्यानंतर मंदावतो; म्हणून अध्यात्मात स्त्रिया संत होण्याची संख्या त्यामानाने अल्प असते. स्त्रीवर घर सोडून पुरुष साधनेसाठी बाहेर पडू शकतो; परंतु स्त्रीला असे करणे थोडे कठीण जाते.

३. आईच्या गर्भाचे अनन्यसाधारण महत्त्व 

विज्ञानाच्या साहाय्याने बाळाला काचेच्या पेटीत (इन्क्युबेटरमध्ये) जिवंत ठेवता येऊ शकते; परंतु संपूर्ण विश्वात विज्ञानाला आजपर्यंत अशी एकही काचेची पेटी (इन्क्युबेटर) बनवता आली नाही की, ज्यामध्ये आईच्या गर्भातील माया, संस्कार आणि प्रेम त्या बाळाला देता येईल.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.४.२०२०)