उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. युगंधर नीलेश शेटे हा या पिढीतील आहे !
‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. युगंधर नीलेश शेटे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२० मध्ये त्याची पातळी ५५ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. स्वावलंबी
‘दळणवळण बंदी लागू झाल्यापासून युगंधर ‘आठवड्यातून २ – ३ दिवस स्वतःचे कपडे धुणे, ते वाळत घालणे आणि वाळल्यावर कपड्यांच्या घड्या करून ते कपाटामध्ये ठेवणे’, अशी कामे करतो. तो जेवल्यावर स्वतःचे ताटही धुतो.
२. कुशाग्र बुद्धी
त्याचे पाठांतर लवकर होते. बालवाडीत असतांना त्याने शाळेत लोकमान्य टिळकांविषयी भाषण केले होते. त्यात त्याचा प्रथम क्रमांक आल्याने त्याच्या वर्गशिक्षिकेने त्याला पारितोषिक दिले होते.
३. घरकामात साहाय्य करणे
तो ‘पाणी भरणे, दूध आणणे, रिकाम्या वेळेत स्वतःहून पटल, आसंदी आणि खिडक्या पुसणे, स्नानगृह स्वच्छ करणे’, या घरातील कामांत साहाय्य करतो.
४. शाळेत सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे
शाळेतील सर्व कार्यक्रमांत तो उत्साहाने भाग घेतो. त्याच्या वर्गशिक्षिकेने सांगितले, ‘‘तो शांत स्वभावाचा आहे. शाळेत दिलेल्या सर्व सूचनांकडे त्याचे पूर्ण लक्ष असते आणि त्या सूचना तो तंतोतंत पाळतो.’’
५. देवाची आवड असणे
५ अ. आई समवेत नसतांनाही वडिलांच्या समवेत पंढरपूरला जाणे : त्याला श्री विठ्ठलाची आरती म्हणायला आणि नाम घ्यायला आवडते. तो आईला सोडून दोन दिवस पंढरपूरला जायला सिद्ध झाला. तो ४ वर्षांचा असतांना माझ्या (वडिलांच्या) समवेत पंढरपूरला गेला होता. त्या वेळी त्याची आई आमच्या समवेत नव्हती.
५ आ. तो प्रत्येक आषाढी एकादशीला ‘वारकरी’ बनून उत्साहाने शाळेत जातो. त्याला खेडच्या हिंदु राष्ट्र्र-जागृती सभेमध्ये बालकक्षावर ‘वारकरी’ ही भूमिका करण्याची संधी मिळाली होती.
५ इ. तो भ्रमणभाषवर आरत्या आणि स्तोत्रे ऐकतो अन् ती पाठ करण्याचा प्रयत्न करतो. तो नामजप भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि अनुभूती सांगतो.
५ ई. कोल्हापूर येथील संत प.पू. व्हटकर महाराज यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ‘युगंधरवर श्री विठ्ठलाची कृपा आहे’, असे सांगितले होते.
६. संतांप्रती भाव
तो साडेचार वर्षांचा असतांना एकदा सद्गुरु सत्यवान कदम आमच्या घरी आले होते. तेव्हा आम्ही त्यांच्या चरणांखाली आसन (संतांच्या चरणांखाली घालतात, ते पायपुसणे) ठेवायला विसरलो होतो. तेव्हा त्याने आम्हाला याची आठवण करून दिली.
७. स्वभावदोष
हट्टीपणा, स्वार्थीपणा, धांदरटपणा आणि रागीटपणा.’
– श्री. नीलेश शेटे (वडील), कोल्हापूर (वर्ष २०२०)