चूक झाल्यावर कान पकडून क्षमा का मागावी ?

अनेकदा आपली एखादी चूक झाली की, आपण म्हणतो, ‘माझे चुकले. कान पकडतो !’ काही जण तर शब्दशः कानाला हात लावतात. याला अनेक धार्मिक, पारंपरिक आणि अन्य कारणे आहेत. सहस्रो वर्षांपूर्वीपासून आपले वेद, ग्रंथ, ज्ञान यांचे जतन, हे मौखिक परंपरेने, म्हणजे ‘गुरूंनी सांगणे आणि शिष्यांनी ते ऐकून पाठ करणे’, अशा प्रकारे केले गेले. मेंदूमध्ये ज्ञान साठवतांना आपण जे पाहिले, स्पर्शिले, गंध घेतला, ते थेट नोंदवले जाते. सहस्रो वर्षे, सहस्रो ज्ञानी माणसांनी याच मार्गाने सर्व अनुभवून त्याचे विश्लेषण त्यांनी रचून ठेवलेल्या ऋचा किंवा श्लोक यामध्ये केले. ते सर्व केवळ ऐकून आपल्या मेंदूमध्ये साठवण्याची क्रिया सहस्रो वर्षे चालू आहे. गद्य लिखाण पाठ करणे, हे तुलनेने जरा कठीण असते; पण पद्य मात्र लवकर पाठ होते. त्यामुळे आपले सर्व ज्ञान हे ऋचाबद्ध, श्लोकबद्ध आहे. साहजिकच त्यासमवेत संगीतही सहज विकसित होत गेले. या पार्श्वभूमीवर या प्रथेची आपण विविध कारणे पाहूया ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

१. चुकीचे परिमार्जन म्हणून उजव्या कानाला उजवा हात लावून ज्ञानाच्या कर्णद्वाराची क्षमा मागितली जाणे 

अत्यंत मौलिक आणि सहस्रो वर्षे टिकवलेले हे मौखिक ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे कार्य हे कानांच्या मार्गाने होते. त्याचप्रमाणे संगीतातील ७ शुद्ध आणि ५ कोमल स्वर गुरुमुखातून ऐकून लक्षात ठेवणे अन् ते आपल्या कंठातून पुन्हा अचूकपणे निर्माण करणे, हे आणखीनच कठीण काम आहे. अशा खडतर प्रशिक्षणानंतर शिष्याकडून वेद म्हणतांना किंवा गायनामध्ये जर काही चूक झाली, तर ‘ती गुरूंनी चुकीचे शिकवल्यामुळे नसून आपण चुकीचे ऐकल्यामुळे झाली आहे’, असा शिष्याचा भाव असतो. अशा चुकीचे परिमार्जन म्हणून उजव्या कानाला उजवा हात लावून ज्ञानाच्या या कर्णद्वाराची क्षमा मागितली जाते. श्रद्धेची ही एक उच्च पातळी आहे.

२. चुकीचे वागला, तर कानांची क्षमा मागणे आवश्यक !

भारतीय सामुद्रिक, तसेच अंगलक्षण शास्त्रामध्ये कानांना खूप महत्त्व आहे. माणसाच्या कानाचा आकार, रंग, रचना यावरून त्या माणसाचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व जाणता येते. तुमचे कान ‘तुम्ही चांगलेच आहात’, असे दर्शवत असतील आणि तुम्ही जर चुकीचे वागला, तर त्या कानांची क्षमा मागणे आवश्यक ठरते.

३. चुकीचे परिमार्जन म्हणून उजवा हात उजव्या कानावर ठेवून कानामधील देवतांशी एक प्रकारे भेट घडवली जाणे

कान पकडण्याला एक अतिशय महत्त्वाचे धार्मिक कारणही आहे. आपल्या उजव्या कानामध्ये काही महत्वाच्या देवतांचा वास असतो, असे मानले जाते. याविषयी गुरुचरित्रात असे वर्णन आहे,

त्या देवतांची नावे ऐका । सांगेन ऋषि सकळिका ।
अग्नि आप वरुणार्का । वायु इंद्र चंद्र असती ।।

– गुरुचरित्र, अध्याय ३६, ओवी १२७

अर्थ : त्या देवतांची नावे मी सर्व ऋषींना सांगतो. ती अशी – अग्नि, जल, वरूण, सूर्य, वायू, इंद्र आणि चंद्र.

त्याचप्रमाणे उजव्या हातावर पाच महत्त्वाच्या तीर्थांचा वास असल्याचे मानले जाते.

अंगुष्ठमूळ तळहातेसी । अग्निब्रह्मतीर्थ परियेसी ।
तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी । पितृतीर्थ असे जाण ।।

– गुरुचरित्र, अध्याय ३६, ओवी १५४

अर्थ : तळहातावर अंगठ्याच्या मुळाशी अग्निब्रह्मतीर्थ तसेच तर्जनी आणि अंगठा यांच्या मध्यभागी ‘पितृतीर्थ’ आहे, असे जाणावे.

चतुर्थ अंगुलीचे वरी । देवतीर्थ अवधारी ।
कनिष्ठिका भागोत्तरी । ऋषितीर्थ परियेसा ।।

– गुरुचरित्र, अध्याय ३६, ओवी १५५

अर्थ : हाताच्या चौथ्या बोटावर (अनामिकेवर) देवतीर्थ आणि करंगळीच्या वरील भागात ‘ऋषितीर्थ’ आहे, असे जाणावे.

त्यामुळे चुकीचे परिमार्जन म्हणून उजवा हात उजव्या कानावर ठेवून कानामधील देवतांशी या महत्त्वाच्या तीर्थांची एक प्रकारे भेट घडवली जाते.

४. शरीरशास्त्रानुसार कानाचे महत्त्व

आपल्या पूर्वीच्या शरीरशास्त्राच्या ज्ञानानुसार कानामध्ये काही महत्त्वाच्या नसा एकवटल्या आहेत. कान टोचल्यामुळे दम्यासारख्या व्याधी दूर रहातात, असेही मानले जात असे. दृष्टी सुधारणे आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूला ताजेतवाने (रिफ्रेश) करण्यासाठी ‘ॲक्युप्रेशर’ (बिंदूदाबन) म्हणून कानावर ठराविक ठिकाणी दाब दिला जातो.

५. गाणे गातांना गायकाने कानाला स्पर्श करणे आणि कानामागे हात ठेवणे यांमागील कारण

गायकाला एखादी कठीण लय गातांना नीट जमली नाही किंवा ती नीट जमेल का, अशी आधीच शंका असेल, तर तो कर्ण स्पर्श करून क्षमा मागतो. मुसलमान गायकांमध्येही अशा चुकीविषयी ‘तौबा’ (क्षमा) करण्याची प्रथा असून तेही कर्ण स्पर्शच करतात. पुष्कळ मोठी, उंच आवाजातील किंवा लांब तान घेतांना, कानांच्या नसांवर ताण येतो. त्या वेळी कानावर हात ठेवल्यामुळे हा ताण न्यून जाणवतो. गायक काही वेळा कानामागे हात ठेवून आपला आवाज आणि वाद्यांचा मेळ नीट जमलाय ना, याचे बारकाईने अनुमान घेत असतो.

– मकरंद करंदीकर

(साभार : सामाजिक संकेतस्थळ)