‘अमेरिकेचा ‘सेंटर फॉर स्ट्रॅटजिक स्टडीज’ हा विचारगट (थिंकटँक) ‘चीन’ या विषयावर संशोधन करतो. त्यांनी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चीनने दक्षिण चिनी समुद्रामध्ये त्याची ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ची (‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ची) क्षमता प्रचंड प्रमाणात वाढवली आहे. यासाठी चीन अनेक वर्षे प्रयत्न करत होता आणि आता ही संपूर्ण प्रणाली सिद्ध झालेली आहे. ज्यामुळे दक्षिण चिनी समुद्रामध्ये त्याची क्षमता वाढणार आहे. चीनची ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ची क्षमता वाढल्याने त्याचा जग, तसेच भारत यांच्यावर काय परिणाम होईल ? आणि भारताने नेमके काय करायला हवे ? याविषयी आज पहाणार आहोत.
१. ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ म्हणजे काय ? आणि त्याचे चीनला मिळणारे लाभ
आपण रडार (इलेक्ट्रॉनिक लहरी नियंत्रित करण्याची यंत्रणा) च्या साहाय्याने माहिती गोळा करतो, रेडिओ संचावर बोलतो किंवा भ्रमणभाषवर बोलतो, तेव्हा त्यात इलेक्ट्रॉनिक लहरी निर्माण होतात आणि त्या एका दिशेकडून दुसर्या दिशेकडे जातात. त्यांना मध्येच अडवून त्या नेमकी काय माहिती पोचवत आहेत, हे शोधले जाते. ही क्षमता निर्माण झाली, तर या भागामध्ये जे लोक दूरभाषवर आणि वेगळ्या टेलिफोनवर बोलतात, त्या भागातून जाणार्या जहाजांच्या संदेशांची देवाणघेवाण किंवा तेथून उडणार्या विमानांचे संदेश यांमधील सर्व माहिती चीनला मिळेल. याखेरीज रडार्सचीही माहिती त्यांना कळू शकेल. अर्थात्च या क्षमतेची गुप्त माहिती मिळवण्यासाठी चीनला मिळाल्यास मोठा लाभ होईल.
दक्षिण चिनी समुद्र हा एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे. तेथून अनेक देशांची जहाजे व्यापार करण्यासाठी ये-जा करत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे चीनला सोपे होईल. तसेच अमेरिका, युरोप किंवा भारत यांची लढाऊ जहाजे किंवा पाणबुड्या तेथून जात असतील, तर त्यांचीही माहिती चीनला मिळेल, तसेच कुठलेही जहाज ‘इलेक्ट्रॉनिक ॲम्बिशन’ करत असेल, तर त्याचीही माहिती मिळेल. त्यामुळे चीनची गुप्तहेर माहिती शोधण्याची क्षमता वाढेल. कदाचित् युद्ध झाले, तर चीनला महत्त्वाची माहिती सहजपणे उपलब्ध असेल. त्यामुळे चीनचे नौदल किंवा पाणबुड्या या इतर देशांच्या पाणबुड्यांना अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतील.
२. वादग्रस्त भागात चीनची युद्धसिद्धता
दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनने अनेक ठिकाणी ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’साठी रडार्स आणि ‘सॅटेलाईट ट्रॅकिंग स्टेशन’ (उपग्रहांशी समन्वय साधण्यासाठी उभारलेली यंत्रणा) उभारली आहेत. त्यातील काही वादग्रस्त भागामध्ये आहेत. हा भाग व्हिएतनाम, तैवान, जपान किंवा फिलीपाईन्स यांचा आहे; पण त्यावर चीनचा दावा आहे. त्यामुळे तो वादग्रस्त आहे. चीन तेथे युद्धाची साधने निर्माण करत आहे. यामुळे ‘लगेच युद्ध होईल’, असे नाही; पण ते कधी होईल, हे येणारा काळच सांगू शकेल.
याच भागातील चिनी सैन्य तळावर पाणबुड्या आणि युद्धनौका तैनात आहेत. यासह तेथे ‘अम्फिबिअस लँडिंग’ (भूमी आणि पाणी दोन्ही ठिकाणी थांबू शकणारी) करणारी चिनी जहाजे तैनात आहेत. ‘ॲम्फिबिअस लँडिंग’म्हणजे अशी जहाजे जी शत्रूच्या समुद्रकिनार्यावर उतरू शकतात आणि सैनिक त्यातून उड्या मारून त्या देशावर आक्रमण करू शकतात. अशा प्रकारची जहाजेही येथे तैनात आहेत. असे म्हणतात की, पुढील काही मासांत चीन तैवानवर आक्रमण करेल; कारण चीन म्हणतो की, तैवान हे स्वतंत्र राज्य नाही, तर तो त्यांचाच एक भाग आहे. अर्थात् तैवानला हे मान्य नाही. तैवान हे एक मोठे बेट आहे, जे चीनपासून १५० ते २०० किलोमीटरच्या आत आहे. त्यावर आक्रमण करायचे असेल, तर ‘ॲम्फिबिअस लँडिंग’ (भूमी अथवा पाणी, असे कुठेही) करावे लागेल. याखेरीज चीनचे ‘ग्रे झोन वॉरफेअर’ही चालू असते, म्हणजे चीनने ज्या शस्त्रांची निर्मिती केली आहे, त्यांची चाचणी घेण्यासाठी तो चीन येथे शांतता काळात सराव करतो.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
३. चीनच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाचा भारतावरील परिणाम
अनेकांनी म्हटले आहे की, चीनने त्यांच्यावर काही ‘लेझर बीम’ (संहारक किरण) सोडले होते. त्यामुळे त्या जहाजांची रडार्स खराब झाली होती किंवा चीनने काही लोकांवर ‘इलेक्ट्रॉनिक’ आक्रमणे करून त्यांच्या बुद्धीमत्तेवर परिणाम केला. अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहेत. चीन अशा प्रकारचे अमानवी प्रयोग करण्यासाठीही प्रसिद्ध आहे आणि तो असे प्रयोग करेल का ? याविषयी कुणाच्याही मनात शंका नको.
लक्षात असावे की, सध्या ही क्षमता दक्षिण चिनी समुद्रात निर्माण केली जात आहे, जो भारतापासून लांब आहे. याचा भारताच्या व्यापारी जहाजांवर नक्कीच परिणाम होईल. चीनकडून त्यांची हालचाल शोधली जाईल. भारताच्या बोटी तैवान, जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम यांच्या भागात गेल्या, तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. अनेक वेळा युद्धाभ्यासासाठी दक्षिण पूर्वेतील देशांच्या सागरी क्षेत्रात पाणबुड्या जातात, त्यांच्यावरही लक्ष ठेवले जाईल. भारताच्या जहाजांची क्षमता, त्यांचा वेग, त्यांची मारा करण्याची क्षमता अशा प्रकारची बरीच तांत्रिक गुप्त माहिती चीन गोळा करील. हे काम शांतताकाळात केले जाते. जर लढाई झाली, तर या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या माध्यमातून गोळा केलेल्या माहितीचा वापर केला जाईल.
४. इलेक्ट्रॉनिक युद्धाचे प्रकार
इलेक्ट्रॉनिक युद्ध हे ‘पॅसिव्ह’ आणि ‘ॲक्टिव्ह’ अशा दोन प्रकारचे असते. ‘पॅसिव्ह’ म्हणजे केवळ ऐकले जाते आणि गुप्त माहिती काढली जाते. ‘ॲक्टिव्ह’ म्हणजे या माध्यमातून जहाजे आणि विमाने यांवरील इलेक्ट्रॉनिक प्रणाली बंद पाडल्या जाऊ शकतात. जहाजांचे रडार्स, जहाजांची ‘इलेक्ट्रॉनिक इमिशन्स (उत्सर्जन)’ नादुरुस्त करणे आदी गोष्टी केल्या जाऊ शकतात. विमानांची संपर्कयंत्रणा (कम्युनिकेशन सिस्टिम) बंद पाडली जाऊ शकते. अशा प्रकारेही हे ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ लढले जाऊ शकते.
५. भारतानेही चीनच्या ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी योग्य पावले उचलावी !
अशा परिस्थितीत ‘भारताचे पहिले संरक्षणदल प्रमुख जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात हा घातपात असावा का ?’, ‘चीनने असे काही उलट काम केले असावे का ?’, असा संशय निर्माण होतो. नेमके काय झाले, हे शोधण्याचे काम सैन्याचे आहे आणि ते शोधतीलच; परंतु ‘भारताची अशी हानी करण्याची क्षमता चीनमध्ये आहे’, याविषयी कुणाच्याही मनात अजिबात शंका नको. त्यामुळेच जेव्हा चीन इलेक्ट्रॉनिक युद्धाचा वापर करतो, तेव्हा युद्ध करण्याच्या विविध पद्धतींमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक युद्ध’ हीही महत्त्वाची पद्धत आहे. चीनच्या या ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’चा युरोप, अमेरिका, भारत आणि अन्य देश यांनाही त्रास होणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारची क्षमता भारतानेही निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आवश्यकता भासली, तर आपणही चीनच्या ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ला इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या प्रतिकार करून ‘जशास तसे’ उत्तर देऊ शकतो. मला निश्चिती आहे की, भारतीय सैन्यदल आणि भारतीय सुरक्षा व्यवस्था यावर विचार करील आणि चीनच्या विरुद्ध सिद्ध रहाण्यासाठी आपल्याला नेमके काय करायला पाहिजे, याचे विश्लेषण करतील, तसेच योग्य ती पावले उचलतील.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे