नियम म्हणजे नियमच !

संपादकीय

कोरोनाच्या नियमांमध्ये अव्वल टेनिस खेळाडूलाही सूट न देणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून शिकावे !

(डावीकडे) नोवाक जोकोविच , (उजवीकडे) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी आलेला जगातील ‘क्रमांक १’चा टेनिस खेळाडू असलेला नोवाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियाच्या सरकारने व्हिसा नाकारला आहे. वैद्यकीय नियमांमध्ये सूट मिळण्यासाठी आवश्यक ते कारण आणि कागदपत्रे दाखवण्यास नोवाक अपयशी ठरले असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्यांना माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नोवाक यांनी त्यांना ऑस्ट्रेलियाकडून वैद्यकीय नियमांमध्ये सूट मिळाल्याचा दावा करत ऑस्ट्रेलिया गाठली; मात्र सीमेवर तेथील अधिकार्‍यांकडून झालेल्या पडताळणीत तशी सूट मिळण्याचे एकही ठोस कारण ते देऊ शकले नाहीत. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. ही त्यांची मूळ चूक आहे. त्यांच्याकडे लस घेण्यासाठी कालावधी होता; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना एकदा कोरोना संसर्ग होऊन गेला आहे.

ऑस्ट्रेलियाचे कणखर पंतप्रधान

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ ट्वीट करून म्हटले आहे, ‘नियम हे नियम आहेत आणि विशेष करून आमच्या सीमांविषयीचा प्रश्न येतो, तेव्हा कुणीही नियमांच्या वर नाही. सीमांविषयीच्या आमच्या कणखर धोरणांमुळेच जगात कोरोनाचा प्रकोप झाला असतांना ऑस्ट्रेलियात मृत्यूदर सर्वांत अल्प होता. त्यामुळे आम्ही सतर्क राहू.’

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे हे उद्गार राष्ट्रप्रेमी आणि तत्त्वनिष्ठ नेता कसा असावा ? याचे निर्देशक आहेत. ९ हून अधिक वेळा ‘ग्रँड स्लॅम’ ही जागतिक टेनिस स्पर्धा जिंकलेल्या एका जागतिक ख्यातीच्या टेनिस खेळाडूचा व्हिसा रहित करणे, ही तशी साधी गोष्ट नाही. ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या या निर्णयाविषयी त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे; मात्र तेथील सरकार ठाम आहे. नोवाक हे त्यांच्या सर्बिया या देशाकडून टेनिस खेळतात, तेथील राष्ट्राध्यक्षांनी नोवाकची पाठराखण करत न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे. तसेच ‘सर्बिया त्यांच्या पाठिशी आहे’, असे सांगितले आहे. अन्य देशांतूनही टीकेचे सूर उमटत आहेत; मात्र एखाद्याच्या जागतिक ख्यातीचा आणि देशातील नियम मोडण्याचा कोणताही संबंध नाही, हे ऑस्ट्रेलिया दाखवून देत आहे. सध्या जागतिक स्तरावर कोरोना महामारीचा काळ चालू आहे. महामारीमुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कोट्यवधी लोक बाधित होऊन बरे झाले असले, तरी त्यांच्या आरोग्याच्या काही ना काही तक्रारी चालू आहेत.

कोरोनाची लागण अधिक प्रमाणात अमेरिका आणि युरोप येथील देशांमध्ये झाली. तेथे मृत्यूचा दरही अधिक होता; कारण तेथील सरकारने बराच कालावधी लोकांवर कोणतेही निर्बंध घातले नव्हते. काही देशांमध्ये दळणवळण बंदी काही दिवस लागू केली, ती पुन्हा उठवली, पुन्हा लागू केली, असे केल्याने संसर्ग होत राहिला. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे थोडे दूर असणारे देश मात्र सतर्क राहिले. त्यांनी कठोर निर्बंध लावले, त्या निर्बंधांना ते चिकटून राहिले आणि त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळाले.

भारतात नियमांविषयी अनास्था

याउलट चित्र भारतात ! येथे कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्वसामान्यांसाठी कठोर नियम असतांना आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थितीचे बंधन असतांना मंत्री, आमदार, खासदार यांच्या मुलांचे विवाह सोहळे झाले. त्यामध्ये आणि मेजवान्यांमध्येही सहस्रो लोकांची उपस्थिती होती. कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले, तरी कुणावरही कारवाई झाली नाही. ज्यांनी नियम बनवले, त्यांच्याकडूनच ते झुगारले जातात. ‘मुखपट्टी (मास्क) घालावी’, अशी साधी, सोपी सूचना असतांना लोकप्रतिनिधींकडूनच ती पाळली जात नाही आणि काही राजकीय नेत्यांनी ‘तिची आवश्यकताच नाही’, असे सांगितले. जमावबंदी असतांना देहलीतील मरकज येथे ‘तबलिगी जमात’चे शेकडो धर्मांध एकत्र आल्याच्या घटनेचा निषेध केल्यावर निषेध करणार्‍यांनाच गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली. त्या संघटनेच्या प्रमुखाला अद्यापही अटक केलेली नाही. त्यामागेही धर्मांधांचा दबाव आहे कि सरकार कारवाई करण्यास घाबरत आहे ? हे लक्षात आले नाही.

प्रतिकात्मक छायाचित्र

हे झाले कोरोनाविषयी ! फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर त्यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार केला म्हणून आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सौदी अरेबियामध्ये आर्थिक फसवणुकीच्या एका प्रकरणात तेथील राजाला २ वर्षे कारावासाची शिक्षा झाली. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांना ११ घंट्यांची कारावासाची शिक्षा झाली. हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाऊन ज्युनिअर यांनाही त्यांनी अमली पदार्थ सेवन करून त्याच्या प्रभावाखाली वेगाने गाडी चालवल्यामुळे ते दीर्घकाळ कारागृहात होते. जागतिक स्तरावरील अशी अनेक उदाहरणे देता येतील. विदेशातील कठोर नियमांविषयी विदेशात जाणार्‍या भारतियांना ठाऊक असते. त्यामुळे भारतात रस्ते अथवा सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी केर टाकणारे विदेशात मात्र सभ्य गृहस्थाप्रमाणे वागत कचराकुंडीतच केर टाकतात. भारतात कुठेही थुंकणारे, विदेशात तोंड उघडत नाहीत. तेथील दंड अनेक पटींनी असतो. त्यामुळे तेथील नागरिक आणि देशाबाहेरूनही येणारे सतर्क असतात.

भारतात सर्वच नियमांच्या संदर्भात वेगळे चित्र असते. उत्तर भारतातील एका घटनेत तेथील मंत्र्याच्या नातेवाइकाला वेगाने गाडी चालवल्यामुळे महिला वाहतूक पोलिसाने अडवल्यावर त्याने तिच्याशी वाद घातला आणि ‘मी कोण आहे, तुला माहिती नाही का ? तुझी नोकरीच घालवतो’, अशी धमकी दिली. तिच्यावर कारवाई होणार, अशा बातम्या आल्यामुळे समाजातून लोक तिच्या समर्थनार्थ आले. परिणामी तिच्यावरील अन्याय कारवाई टळली. तात्पर्य समाजातील नियम पाळण्यासाठी आणि त्यांचे पालन करून घेण्यासाठी प्रखर राष्ट्रप्रेमाची आवश्यकता आहे !