इतरांचा विचार करणारी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली पुणे येथील चि. सिंहयानी अमोल मुस्तारे (वय ४ वर्षे) हिची ६१ टक्के अध्यात्मिक पातळी घोषित !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. सिंहयानी अमोल मुस्तारे ही या पिढीतील एक आहे !

चि. सिंहयानी मुस्तारे

दुर्गा सप्तशतीत श्री दुर्गादेवीचे नाव ‘सिंहयानी’, असे आहे.

‘वर्ष २०१९ मध्ये ‘चि. सिंहयानी अमोल मुस्तारे हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये तिची पातळी ६१ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  


‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले  

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पुणे, ९ जानेवारी (वार्ता.) – चि. सिंहयानी अमोल मुस्तारे (वय ४ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे ३ जानेवारी २०२२ या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांनी घोषित केले. त्यानंतर चि. सिंहयानी हिला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता जागडे यांनी भेटवस्तू देऊन तिचा सत्कार केला. पातळी घोषित केल्यानंतर चि. सिंहयानीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून हात जोडून भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.

चि. सिंहयानी हिला भेटवस्तू देतांना ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता जागडे

चि. सिंहयानीच्या कुटुंबियांचे मनोगत

१. श्री. अमोल मुस्तारे (बाबा) – चि. सिंहयानी कोणतीही कृती ‘परम पूज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितली आहे’, असे सांगितल्यावर ती लगेचच कृतीत आणते. तिच्यात आज्ञापालन हा गुण आहे.

२. सौ. सोनाली अमोल मुस्तारे (आई) – मी केवळ निमित्तमात्र आहे, सगळे देवाने केले.

३. श्रीमती मंगला मुस्तारे (आजी) – गुरुमाऊलींना मी सतत प्रार्थना करायचे, ‘मला तुमच्या चरणांशी घ्या.’ आज सिंहयानीची पातळी घोषित झाल्यानंतर ‘गुरुदेवांनी माझी प्रार्थना ऐकली’, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

चि. सिंहयानी हिची तिच्या आजीला (वडिलांच्या आईला) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्रीमती मंगला मुस्तारे

१. ‘सिंहयानी तिच्या वस्तू आणि खेळणी जागच्या जागी ठेवते.

२. नम्र : तिला काही वस्तू किंवा खाऊ हवा असल्यास, ती ‘मला देशील का ?’, असे विचारते. तिच्या आई-बाबांनाही ती ‘काही हवे का ?’, असे नम्रतेने विचारते.

३. उत्तम स्मरणशक्ती : तिला झोपवतांना श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांची गोष्ट सांगतांना माझ्याकडून एखादा प्रसंग सांगायचा राहिल्यास, ती मला त्याची आठवण करून देते.

४. सिंहयानी कापड घेऊन घरातील शीतकपाट, आरसा, जेवणाचे पटल इत्यादी स्वच्छ करते.

५. सिंहयानीला एखादी गोष्ट सांगितल्यावर ती अनेक प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेते.

६. प्रेमभाव

अ. घरात कुणाला जखम झाल्यास सिंहयानी त्या जखमेवर हळद किंवा मलम लावते.

आ. आमच्या घरी ‘बेला’ नावाची एक कुत्री आहे. मध्यंतरी तिच्या अंगाला कंड (खाज) येत होती. तेव्हा सिंहयानीने स्वतः वापरत असलेली पावडर २ – ३ दिवस बेलाच्या अंगाला लावली. तेव्हा बेलाला लगेच बरे वाटले आणि तिच्या शरिराची कंडही न्यून झाली.

इ. सिंहयानी लहान मुले, घरातील सर्व सदस्य आणि शेजारी यांच्याशी प्रेमाने वागते. तिला खाऊ दिल्यास ती सर्वांना देते. तिची खेळणी ती समवेत खेळणार्‍या अन्य मुलांनाही खेळायला देते.

७. प्रगल्भता : सिंहयानीची मैत्रीण तिचा नवीन रूमाल आमच्या घरी विसरली होती. सिंहयानीने मैत्रिणीला सांगूनही ती रूमाल घेऊन गेली नव्हती. तेव्हा मी सिंहयानीला म्हणाले, ‘‘मी तो रुमाल वापरते.’’ तेव्हा ‘आजी, दुसर्‍यांच्या वस्तू वापरायच्या नसतात’, असे म्हणून सिंहयानीने माझ्याकडून तो रूमाल घेतला आणि मैत्रिणीला नेऊन दिला.

८. सेवाभाव

अ. तिची आई कार्यालयात जायला निघत असतांना ती जेवणाचा डबा आईच्या हातात देते आणि आई घरी आल्यावर तिच्या ‘पर्स’मधील डबा काढून घासायला ठेवते.

आ. घासलेली भांडी जागेवर लावत असतांना मला वाकायला लागू नये; म्हणून ती एकेक भांडे माझ्या हातात आणून देते.

इ. आमचा चहा पिऊन झाल्यावर ती आमचे चहाचे रिकामे कप उचलून ठेवते.

ई. कुणाला प्यायला पाणी हवे असल्यास ती त्यांना पाणी आणून देते.

९. साधनेची ओढ

अ. मी नामजप करायला बसल्यावर तीही माझ्यासह नामजप करते.

आ. ती प्रतिदिन तिच्या आई-बाबांसह प्राणायाम, योगासने आणि सूर्याेपासना करते. ती सर्वांसह १०८ वेळा ‘ॐ र्‍हीं सूर्याय नमः ।’, हा नामजप करते.

इ. सिंहयानी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या गोष्टी तिचे आई-बाबा अन् मैत्रिणी यांनाही सांगते.

१०. भाव

अ. मी तिला रामायणातील शबरीमातेची गोष्ट सांगते. ‘शबरीमातेने लहानपणापासून मातंगऋषींच्या आश्रमात राहून सेवा आणि श्रीरामाची भक्ती केली. तेव्हा श्रीरामाने येऊन तिचा उद्धार केला’, ही गोष्ट ऐकतांना सिंहयानीचा भाव जागृत होतो.

आ. ती प्रतिदिन शाळेत किंवा कुठेही बाहेर जातांना प.पू. गुरुदेव आणि देवता यांना नमस्कार करते अन् ‘मी जाऊन येते’, असे त्यांना सांगते आणि बाहेर जाऊन आल्यानंतर ती त्यांना ‘मी जाऊन आले’, असे सांगते.

इ. ‘श्रीरामाने शबरीमातेचा उद्धार केला, तसे प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्या दोघींचाही उद्धार करणार आहेत’, असे सांगितल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो.

ई. ती लहान असतांना तिच्या बाबांनी तिला खेळणी, कपडे किंवा काही वस्तू आणल्यास ते तिला सांगत, ‘‘हे मी आणले नाही. हे सर्व तुला प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) दिले आहे.’’ तेव्हापासून तिला कोणतीही वस्तू आणल्यास ती ‘मला ही वस्तू प.पू. आजोबांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) दिली आहे’, असे कृतज्ञतापूर्वक सांगते.’

– श्रीमती मंगला अरुण मुस्तारे [आजी (वडिलांची आई), वय ५८ वर्षे], धायरी, पुणे. (१७.१२.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता