कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या घराघरात सर्दी-ताप-खोकला यांची साथ आहे. ही परिस्थिती वातावरणातील पालटांमुळे नैसर्गिकरित्या निर्माण झाली आहे; मात्र प्रशासन त्याकडे केवळ ‘कोरोना’च्या दृष्टीनेच बघत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांकडून केली जाणारी वक्तव्ये आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्या जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. या परिस्थितीत जिल्ह्यातील जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्या माध्यमातून तात्काळ साथीच्या आजारांवर उपयोगी औषधोपचार चालू करणे प्रशासनाकडून अभिप्रेत आहे, असे मत मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात गावडे यांनी म्हटले आहे की….
१. एकीकडे कोरोनाच्या तिसर्या लाटेचे आगमन झाल्याचे प्रशासन सांगत आहे; मात्र दुसरीकडे त्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
२. जिल्ह्यात पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनी जनतेला उपदेश करण्याऐवजी जिल्हा प्रशासन साथरोगांवर नियंत्रण आणण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करत आहे ? तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून आरोग्य यंत्रणेत कोणत्या सुधारणा करत आहे ?, हे प्रथम घोषित करावे.
३. या आपत्तीच्या काळात १ वर्षाहून अधिक कालावधी उलटून देखील जिल्ह्याला जिल्हा शल्यचिकित्सक उपलब्ध होऊ शकला नाही, ही नामुष्की जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आहे.
४. कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनुभवी डॉक्टरांच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात जवळपास १ सहस्र ३०० हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. याचे दायित्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी घेणार का ?
५. जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, तसेच जनतेने देखील भयभीत न होता शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सततचा ताप आणि खोकला यांचा अधिक त्रास जाणवल्यास आरोग्यसेवकांशी संपर्क साधावा.