श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या चुकांच्या सत्संगाचा सनातनच्या पुरोहितांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

संतांच्या सत्संगाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘हिंदु धर्माने सांगितलेले पूजाविधी, धार्मिक विधी, यज्ञयाग इत्यादी करण्यासाठी सात्त्विक पुरोहितांची आवश्यकता आहे. सध्याच्या कलियुगात बहुतांश पुरोहित उदरनिर्वाहासाठी पौरोहित्य करतात. पुरोहितांनी पौरोहित्य ‘साधना’ म्हणून केल्यास त्यांची आध्यात्मिक प्रगती होते. समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्त करणार्‍या आणि ईश्वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्‍या पुरोहितांना सिद्ध (तयार) करून अल्प कालावधीत मोक्षाला नेण्याच्या व्यापक उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन-पुरोहित पाठशाळे’ची स्थापना केली. या पाठशाळेतील पुरोहितांना केवळ मंत्रोच्चार कसा करावयाचा ? हे शिकवले जात नसून त्यासह विधीपूर्व देवता पूजनाची सिद्धता शास्त्रशुद्धदृष्ट्या कशी करायची ? विधी भावपूर्ण कसा करावयाचा ? यांचे, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचेही शिक्षण दिले जाते. या पाठशाळेतील पुरोहित यजमानाला धार्मिक विधींचा अर्थ सांगून त्यांच्याकडून त्या शास्त्रशुद्ध करवून घेत असल्याने त्या विधींतून यजमानाला अधिकाधिक आध्यात्मिक लाभ होतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी आश्रमात वर्ष २०१८ पासून अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांचे पौरोहित्य सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी भावपूर्ण केले. त्यांनी पौरोहित्याची सेवा करतांना स्वतःकडून होणार्‍या लहान-मोठ्या चुकांचे सखोल चिंतन करून त्यावर उपाययोजना काढून प्रयत्न केल्यास त्यांची साधनेत जलद प्रगती होते. यादृष्टीने सनातनच्या पुरोहितांना उन्नत साधक, तसेच संत यांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन लाभते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी २.८.२०२१ या दिवशी सनातन पुरोहितांना चुकांच्या सत्संगात (टीप) मार्गदर्शन केले. संतांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सनातनच्या पुरोहितांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या पुरोहितांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

टीप – सनातन संस्थेत साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी सत्संगातून मार्गदर्शन करण्यात येते. या सत्संगाला ‘चुकांचा सत्संग’ असे म्हणतात.

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या चुकांच्या सत्संगाला सनातन पुरोहित पाठशाळेतील ६ पुरोहित उपस्थित होते. त्या सर्वांची सत्संगापूर्वी आणि सत्संगानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या चुकांच्या सत्संगाचा सनातनच्या पुरोहितांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : सत्संगापूर्वी सनातनच्या पुरोहितांमध्ये अधिक प्रमाणात नकारात्मक आणि अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या चुकांच्या सत्संगातील चैतन्यामुळे सनातनच्या पुरोहितांमधील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. सनातनच्या पुरोहितांवर झालेला सकारात्मक परिणाम पुढे २ दिवस त्यांच्यावर टिकून होता. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप १ – हा सनातनचा पुरोहित काही कारणाने चाचणीला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे सारणीत त्याची त्या दिवशीची निरीक्षणे दिलेली नाहीत.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चुकांच्या सत्संगात साधनेविषयी केलेल्या मार्गदर्शनाने सनातनच्या पुरोहितांमध्ये अंतर्मुखता निर्माण होऊन त्यांना आध्यात्मिक लाभ होणे !

साधकाकडून होणार्‍या लहान-मोठ्या चुकांमुळे त्याची साधना व्यय होते. साधकाने चुकांच्या सत्संगात स्वतःच्या चुका सांगितल्याने त्याचा अहं अल्प होतो, तसेच चुका टाळण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांच्या संदर्भात त्याला सत्संगातून योग्य मार्गदर्शन मिळाल्याने त्याच्या साधनेला गती प्राप्त होते. साधकाने स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी योग्य प्रायश्चित्त घेतल्याने त्याची साधना वाचते. (स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सातत्याने केल्यास साधनेत जलद प्रगती होते. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी फार पूर्वीपासूनच साधकांसाठी चुकांचे सत्संग घेण्यास आरंभ केले. आजपावतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उत्तरदायी साधक सिद्ध झाले असून ते साधकांना चुकांच्या सत्संगात मार्गदर्शन करत आहेत.)

सनातन-पुरोहितांनी चुकांच्या सत्संगात स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी चिंतन सांगितले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चुकांच्या सत्संगात केलेल्या चैतन्यमय मार्गदर्शनामुळे सनातन-पुरोहितांचे मन अन् बुद्धी यांवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण पुष्कळ प्रमाणात अल्प झाले. त्यांच्यामध्ये अंतर्मुखता निर्माण होऊन त्यांनी सत्संगातील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील सात्त्विकता वाढली. विशेष म्हणजे त्यांच्यावर सत्संगाचा सकारात्मक परिणाम पुढे २ दिवस टिकून होता. यातून संतांच्या सत्संगाचे महत्त्व लक्षात येते. साधक-पुरोहितांनी स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया सातत्याने राबवल्यास त्यांची वाटचाल सनातन-पुरोहिताकडून साधक-पुरोहिताकडे, साधक-पुरोहिताकडून शिष्य-पुरोहिताकडे आणि शिष्य-पुरोहिताकडून संत-पुरोहितांकडे जलद गतीने होईल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.११.२०२१)

ई-मेल : [email protected]


प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी

सनातन-पुरोहित पाठशाळेत खर्‍या अर्थाने निःस्वार्थी पुरोहित सिद्ध होत आहेत !

सनातन-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय कल्याणाच्या दृष्टीने सिद्ध होत आहेत. पारंपरिक पद्धतीने चालणार्‍या वेदपाठशाळांमधून अभावानेच असे संस्कार होतात. आध्यात्मिक साधना, स्वतःमधील दोष घालवून चांगले गुण बाणवण्याची तळमळ, सेवाभाव, शिस्त, गुर्वाज्ञापालन, आपुलकीचे वर्तन, श्रद्धा, नम्रता आदी दुर्मिळ गुण या विद्यार्थ्यांमध्ये बाणवले जातात. संस्थेच्या पाठशाळेत खर्‍या अर्थाने निःस्वार्थी पुरोहित सिद्ध होत आहेत. याचे मला फार समाधान वाटते. पाठशाळा उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊन सहस्रो निष्ठावान पुरोहित वेदाभ्यासी विद्यार्थी समाज, हिंदु संस्कृती आणि हिंदु राष्ट्र यांच्या निर्माणासाठी सिद्ध व्हावेत, हीच सदिच्छा ! – आहिताग्नी सोमयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी, बार्शी, जि. सोलापूर.

(संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/890.html (२०.४.२०१४))

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया

स्वभावदोषांमुळे व्यक्तीवर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर दुष्परिणाम होतात. स्वभावदोषांमुळे होणारे हे दुष्परिणाम टाळून तिला यशस्वी आणि सुखी जीवन जगता यावे, यासाठी तिच्यातील स्वभावदोष दूर करून तिच्या चित्तावर गुणांचा संस्कार निर्माण करण्याच्या प्रक्रियेला ‘स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलन प्रक्रिया’, असे म्हणतात. (संदर्भ : सनातनची ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ या विषयावरील ग्रंथमालिका)