आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महमंद’कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाची रेकी !

यावरून आतंकवादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करत असल्याचेच यातून स्पष्ट होते ! – संपादक 

नागपूर – पाकिस्तानपुरस्कृत ‘जैश-ए-महमंद’ या आतंकवादी संघटनेने महाला परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, रेशीम बाग येथील डॉ. हेगडेवार स्मृती मंदिर परिसर यांसह अन्य काही भागाची रेकी केल्याचा प्रकार पुढे आला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून महाराष्ट्राच्या पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रेकीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी ‘युएपीए’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आतंकवादी कारवायांच्या अंतर्गत जम्मू-काश्मीर येथे नुकत्याच अटक करण्यात आलेल्या एका युवकाने नागपूर येथे रेकी केल्याची माहिती दिली. जुलै २०२१ मध्ये २ दिवस नागपूर येथे येऊन रेकी केल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील संवेदनशील भागांत पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.