पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत चूक राहिल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

  • पंजाब दौर्‍याच्या वेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा मार्ग अचानक अडवला !

  • केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागितला !

नवी देहली – पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. पंजाब सरकारने या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.

१. सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेत ‘पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणीही करण्यात आली आहे.

२. भाजपच्या नेत्यांनी पंजाबच्या राज्यपालांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींचे सूत्र उपस्थित केले. त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.