अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मराठीतूनही !

अभियांत्रिकी अभ्यासक्रम

पुणे – राज्यातील ३५० अभियांत्रिकी संस्थांपैकी १७९ संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने संकलित केलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाचे आवाहन केले होते. (महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? – संपादक) त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अभियांत्रिकी पदविका इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमधून शिकवण्याच्या संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले होते.

द्विभाषिक अभ्यासक्रमासाठी मंडळाकडून सैद्धांतिक विषयासाठी मराठी अभ्यास साहित्याची निर्मिती केली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि पाठ्यक्रम इंग्रजीमध्ये असेल; मात्र सैद्धांतिक विषयाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी भाषेतून उत्तरे लिहिण्याची मुभा असेल. इंग्रजी विषय जड वाटत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी द्विभाषिक अभ्यासक्रम चालू केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने विषय समजण्यास साहाय्य होईल, असे मत गडचिरोलीतील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अतुल बोराडे यांनी व्यक्त केले.