प्रश्न : साप चावला तर आयुर्वेदाकडे उत्तर आहे का ?
उत्तर : आयुर्वेदाच्या आठ अंगांमध्ये समाविष्ट ‘अगदतंत्र’ या शाखेत साप, विंचू, अन्य विषारी प्राणी किंवा कीटक, तसेच अन्नविषबाधा वा तत्सम विषांचे वर्णन आणि उपचार आलेले आहेत. आचार्य चरकांनी सर्पविषावर २४ विविध उपक्रम सांगून ठेवले आहेत. यांतच ‘अरिष्टाबंधन’ म्हणजे आज ज्याला ‘टॉरनिक्वेट’ बांधणे (जेणेकरून विष सर्व शरिरात पसरण्याचा वेग मंद व्हावा) याचाही समावेश होतो.
आयुर्वेदात ‘विष’ या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. दुर्दैवाने आज आयुर्वेदाला स्वतंत्रपणे उपचार करता येत नाही. याकरताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश झालेल्या व्यक्तीला नेणे योग्य आहे. तरीही गावागावांत आजही काही पदवीधर वैद्य अटीतटीच्या प्रसंगी वा कित्येकदा ‘अँटीस्नेक व्हेनम्’ (साप चावल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून देण्यात येणारे औषध) उपलब्ध नसतांना असे उपचार देतात. ‘आघाड्याचा क्षार हा विष न्यून करण्यावर उपयुक्त आहे’, असे वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. सर्पगंधा ही वनस्पती लावल्याने साप फिरकत नसल्याने आजही गावांत घराजवळ किंवा गोठ्याजवळ तिची लागवड करण्याचा प्रघात आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.