जळगाव येथील भाजपच्या २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस !

भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रकरण

जळगाव – येथील महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधून बाहेर पडून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या भाजपच्या २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्या पात्रतेविषयी येत्या ११ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता नाशिक येथे सुनावणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना उपस्थित रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुनावणीत कोणते नगरसेवक पात्र ठरणार, हे निश्चित होईल.

जळगाव महापालिकेत भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व आहे; मात्र असे असतांनाही शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली आहे.

काय आहे प्रकरण ?

जळगाव महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीच्या वेळी भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला. त्यांनी भाजपचे गटनेते आणि उपगटनेते यांना काढून टाकून नवीन पदाधिकारी नियुक्त केले. त्यात दिलीप पोकळे यांना गटनेते म्हणून नियुक्त केले. शिवाय प्रभाग समिती सभापती निवडीतही त्यांनी स्वतःचा पक्ष भाजप असून आपण दिलेल्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप भाजप नगरसेवकांना बजावला; मात्र भाजप नगरसेवकांनी तो व्हीप स्वीकारला नाही. त्यामुळे दिलीप पोकळे यांनी २ ऑगस्ट २०२१ या दिवशी नगरसेवक सीमा भोळे यांच्यासह २९ नगरसेवकांना अपात्र करावे, अशी तक्रार पक्षाचे गटनेते म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार भाजपच्या २९ नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.