(म्हणे) ‘सूर्यनमस्काराचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !’

  • स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त शाळांमधून आयोजित सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमाला ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चा विरोध

  • मुसलमान विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन !

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली रस्त्यावर नमाजपठण करून अन्य धर्मियांना त्रास देणे चालते का ? मुसलमान धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंच्या मंदिरांमध्ये नमाजपठण कसे करतात ? याच न्यायाने धर्मनिरपेक्षतेच्याच नावाखाली सूर्यनमस्कार कार्यक्रम सरकार आयोजित करत असेल, तर ते योग्यच होय ! – संपादक

नवी देहली – स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमांच्या आयोजनाचा ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ने विरोध केला आहे. त्याने मुसलमान विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांत १ ते ७ जानेवारी या काळात सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा बोर्डाचे सरचिटणीस आणि महासचिव मौलाना (इस्लामी विद्वान) खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी विरोध केला आहे.

(सौजन्य : India Today)

मौलाना रहमानी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे बहुसंख्यांक समाजाच्या प्रथा-परंपरा आणि पूजा पद्धती अन्य धर्मियांवर थोपवल्या जाऊ शकत नाहीत. हा आदेश राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. राज्यघटनेने प्रत्येक पंथियाला त्याच्या पंथाप्रमाणे पूजा-प्रार्थना करण्याचा अधिकार दिला आहे. अशा वेळी एका विशेष धर्माच्या पूजा पद्धती अन्य पंथियांवर थोपवता येऊ शकत नाहीत. इस्लाममध्ये सूर्याला देवता मानून त्यांची पूजा करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. सरकारने राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेचा सन्मान करून हा आदेश मागे घेतला पाहिजे.