जळगाव, २ जानेवारी (वार्ता) – कु. प्रज्ञा अनिल हेम्बाडे या जन्मतःच मतिमंद असूनही त्यांच्यातील गुण आणि त्यांची आंतरिक साधना यांमुळे त्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म – मृत्युच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची घोषणा धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २५ डिसेंबर या दिवशी ऑनलाईन सत्संगात केली. ही वार्ता ऐकताच सर्व साधक भावविभोर झाले. या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी कु. प्रज्ञा यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली.
आंतरिक साधना चालू असल्याने कु. प्रज्ञाची प्रगती झाली ! – सद्गुरु नंदकुमार जाधवयावेळी सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ” प्रज्ञाला इतरांसारखे बोलता येत नाही; पण तिची आंतरिक साधना चालू आहे. त्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने तिची प्रगती झाली. कु. प्रज्ञाच्या उदाहरणातून शिकून सर्वांनी सतत साधनारत राहूया. प्रत्येक क्षणी ‘ आपली साधना कशी होईल ?’ असा प्रयत्न करुया. “ |
सौ. शोभा हेम्बाडे (आई) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
१. ऐकण्याची वृत्ती असणे
अ. ‘वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मी कु. प्रज्ञाला म्हणाले, ‘‘आज गुरुपौर्णिमा आहे. आपण लवकर सिद्धता करूया. आज परम पूज्य गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) येणार आहे.’’ तिने लगेच अंघोळ करून पूर्ण सिद्धता केली. ती घरात प्रार्थना करत फिरत होती. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चालू झाल्यावर ती आसंदीत बसून सर्व गुरुपूजन सोहळा पहात होती. त्या वेळी सूत्रसंचालकाने सांगितल्याप्रमाणे तिने सर्व कृती केल्या.
आ. दिवसभरात तिला आपण ‘आता प्रार्थना करूया’, असे सांगतो, तेव्हा ती त्याप्रमाणे लगेच प्रार्थनेच्या मुद्रेत उभी रहाते किंवा बसते. आपण सांगू तशी ती प्रार्थना करते. तेव्हा असे वाटते की, ‘तिची प्रत्येक प्रार्थना भगवंतापर्यंत पोचत आहे.’
२. देवाच्या अनुसंधानात असणे : तिच्याकडे पाहिल्यावर ‘ती आनंद व्यक्त करत आहे’, असे वाटते. मी प्रज्ञाला जवळ घेते आणि तिच्याशी बोलते, तेव्हा माझे देवाशी अनुसंधान वाढते अन् मनात इतर विचार येत नाहीत.
३. चूक स्वीकारून क्षमा मागणे : तिच्याकडून एखादी चूक झाल्यावर ‘हे चुकीचे आहे’, असे तिला सांगितले की, ती लगेच कान पकडून क्षमा मागते. तिला ‘क्षमा’ म्हणता येत नाही; पण ती तसे बोलण्याचा प्रयत्न करते.
४. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
४ अ. आश्रम आणि साधकांच्या घरी थांबायला आवडणे : कु. प्रज्ञाला पूर्वी आमचे काही नातेवाईक आणि समाजातील काही ओळखीच्या लोकांकडे घेऊन गेल्यावर ती तिथे ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबत नव्हती. याचा अभ्यास केल्यावर ‘ज्यांना आध्यात्मिक किंवा पूर्वजांचा त्रास आहे, अशा व्यक्तींच्या घरी तिला थांबावेसे वाटत नाही’, असे माझ्या लक्षात आले. याउलट तिला आश्रमात आणि साधकांच्या घरी जायला आवडते.
४ आ. नामजप करणार्या नातेवाईकांकडे रहाणे : काही मासांपूर्वी आम्ही आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो. तेव्हा ती तिथे राहिली. या आधी ती तिथे थांबायची नाही. तेव्हा असे लक्षात आले की, काही मासांपासून सर्व जण सनातन संस्था आयोजित ‘नामसत्संग’ ऐकून नामजप करत आहेत.’
सौ. अक्षरा शिंदे (मोठी बहीण), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. आई-वडिलांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर कु. प्रज्ञामध्ये पालट होणे : ‘कु. प्रज्ञा ही जन्मापासून मतिमंद आहे. पूर्वी तिला काहीच कळत नसे. तिला आकडी (झटके) येत असे. त्यामुळे साधारण प्रत्येक मासाला तिला रुग्णालयात भरती करावे लागे. अनुमाने वर्ष १९९६ मध्ये माझ्या आई-वडिलांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यानंतर कु. प्रज्ञामध्ये हळूहळू चांगले पालट होत गेले. आता तिला आकडी येत नाही आणि कधी आलीच, तरी पूर्वीसारखे रुग्णालयात न्यावे लागत नाही.
२. कु. प्रज्ञा करत असलेले साधनेचे प्रयत्न
२ अ. भजने ऐकायला आवडणे : सध्या कु. प्रज्ञाला भजने ऐकायला आवडतात. घरात सतत भजने लावून ठेवावी लागतात. भजने चालू असतांना तिच्या आवडीचे भजन असेल, तर ती ते भजन पुष्कळ एकाग्रतेने ऐकते. भजन ऐकतांना ती गुणगुणते आणि नाचते. ती त्यात पूर्ण एकरूप होऊन जाते.
२ आ. कु. प्रज्ञा प्रत्येक आठवड्याला आमच्या घरी होत असलेला सत्संग शांतपणे ऐकते. ‘तिची साधना अंतर्मनातून चालू आहे’, असे वाटते.
२ इ. राष्ट्रीय भक्तीसत्संग भावपूर्ण ऐकल्याने आध्यात्मिक उपाय होणे : प्रत्येक गुरुवारी होणारा ‘राष्ट्रीय भावजागृती सत्संग’ ती भावपूर्ण ऐकते. भावप्रयोग ऐकत असतांना ती हात जोडते, तेव्हा ‘तो भावप्रयोग तिला कळतो आणि ती त्याप्रमाणे करते’, असे वाटते. त्या वेळी तिच्यावर आध्यात्मिक उपाय होत असतात.
२ ई. आध्यात्मिक त्रास होणे आणि त्यावर उपाय म्हणून प्रार्थना करणे : तिला आध्यात्मिक त्रास होत असतांना तिचे स्वतःवर नियंत्रण नसते. त्या वेळी आम्ही तिला प्रार्थना, नामजप करण्यास सांगितले की, ती त्या त्रासाच्या स्थितीतही प्रार्थना करते. ‘ती जेव्हा प्रार्थना करते, त्या वेळी तळमळीने देवाला आळवत आहे’, असे वाटते.
२ उ. देवाशी सतत अनुसंधानात असणे : ‘तिचे सतत देवाशी अनुसंधान असते’, असे जाणवते. आपण सांगतो, त्याप्रमाणे ती दैनिक ‘सनातन प्रभात’ने आवरण काढण्याचा प्रयत्न करते. त्यातूनही तिच्यावर उपाय होतात.
२ ऊ. इतरांचे पाहून व्यष्टी साधनेचा आढावा देणे : सर्व जण भ्रमणभाषवर नियमित व्यष्टी आढावा देतात, तेव्हा तिलाही वाटते, ‘मीही आढावा द्यायला हवा.’ तेव्हा आई मला ‘भ्रमणभाष’ लावून देते. मी तिला विचारले, ‘प्रार्थना आणि नामजप किती केला ?’ त्या वेळी ती तिच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते.
३. आई-वडिलांना आध्यात्मिक त्रास होत असतांना उपायांचे साहित्य आणून देणे : आमच्या बाबांना त्रास होत असेल, तेव्हा तिला ते न सांगता कळते. त्या वेळी ती बाबांना उपायांसाठी दैनिक, अत्तर आणि कापूर आणून देते. आईला त्रास होत असेल, तेव्हाही ती आईच्या जवळच थांबते.
४. इतरांना साहाय्य करणे : प्रज्ञा प्रेमळ आहे. एरव्ही तिला प्रतिदिन सकाळी उठल्यावर चहा हवा असतो किंवा दुपारीही ४ वाजता चहासाठी ती हट्ट करते; पण आईला बरे वाटत नसेल, तर ती आईच्या जवळच झोपून रहाते. आई उठून चहा देईल, तेव्हाच ती घेते. ती आईच्या जवळ थांबून आईला काय हवे – नको ते विचारते किंवा आईचे पाय चेपते. तिला तसे सर्व कळत नाही; पण तिला जे जमेल, ते करण्याचा ती प्रयत्न करते. घरात अन्य कोणीही तिला ‘पाय दुखत आहेत’, असे सांगितले, तर ती लगेच ‘चेपून देऊ का ?’, असे म्हणून तिला जमेल, तसे त्यांचे पाय चेपते. प्रत्यक्षात तिला जोर देऊन पाय दाबता येत नाहीत; पण इतरांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करून ती त्यातून आनंद घेते.’
कु. पल्लवी हेम्बाडे (लहान बहीण), सनातन आश्रम, देवद पनवेल.
१. सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या व्यष्टी आढाव्याला बसणे आणि प्रतिसाद देणे : ‘मी देवद आश्रमातून घरी येते, त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना ‘ऑनलाईन’ व्यष्टी साधनेचा आढावा देत असतांना ती पूर्ण आढावा माझ्या समवेत बसून ऐकते. सद्गुरु दादांनी आम्हाला काही प्रश्न विचारले, तर ती तिच्या शब्दांत उत्तर देते. मला आधी वाटायचे, ती नुसती बसणार; पण ती प्रत्येक वेळी सद्गुरु दादांच्या वाक्याला ‘हो’, ‘नाही’, असा किंवा तिच्या भाषेत प्रतिसाद देते.
२. शांत वाटणे : मी तिला जवळ घेतल्यावर माझे मन शांत होते. तिच्याशी ‘बोलतांना किंवा खेळतांना अन्य गोष्टी सांगण्यापेक्षा तिच्याशी परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलावे किंवा भजन म्हणावे’, असे मला वाटते.’ मी फेब्रुवारी २०२१ मध्ये घरी आले होते. तेव्हाच्या तुलनेत आता तिच्या तोंडवळ्यावर चांगले पालट जाणवतात.’
श्री. विशाल पवार (आतेभाऊ), जळगाव
१. निरागसता : ‘कु. प्रज्ञामध्ये जन्मतःच निरागसता आहे. तिला साधक, संत आणि नातेवाईक असे कोणीही असो, त्यातील प्रेमळ व्यक्ती तिला लगेच ओळखता येतात. तिच्या मनाची निरागसता इतकी आहे की, तिला लिंगभेद, वयभेद आदी गोष्टींची जाणीव नसते.
२. प्रेमभाव : कु. प्रज्ञा मतिमंद आहे. त्यामुळे इतरांच्या तुलनेत तिचा बुद्धीचा भाग अत्यल्प आहे. तिची स्थिती लहान मुलाप्रमाणे आहे. कुठलीही समाजातील व्यक्ती प्रेमळ असेल, तर तिला ते लगेच जाणवते. त्यामुळे ती त्यांच्याशी आपुलकीने आणि प्रेमाने वागते. केवळ प्रेम द्यायचे आणि घ्यायचे तिला ठाऊक असते.
३. औषधे घेण्याचा कंटाळा न करणे : तिला जन्मापासून आजपर्यंत प्रतिदिन औषधे, गोळ्या आणि वेळ प्रसंगी सलाईन चालू आहे; पण ‘तिला त्याचा कधी कंटाळा आला आहे किंवा औषध नको’, असे ती कधी म्हणत नाही.
४. आईच्या सुख-दुःखात सहभागी होणे : तिच्या आईच्या (सौ. शोभा हेम्बाडे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी असणारी, प्रज्ञा ही एकमेव सखी आहे; कारण तिचा बुद्धीचा भाग जरी अल्प असला, तरी ती व्यक्तीच्या भावभावना समजू शकते.
हे लिखाण करतांना माझ्या मनात एक वाक्य परत परत येत होते, ‘प्रज्ञाच्या आयुष्यरेषा आणि संतत्वाची रेषा या समान आहेत.’
सौ. वैदेही पवार (आतेभावाची पत्नी), जळगाव
बाळाची काळजी घेणे : ‘माझा मुलगा चि. हृषिकेश केवळ पंधरा दिवसांचा असतांना तो रात्रीचा जागा राहून खेळत असे. बाजूला कु. प्रज्ञा झोपलेली असे. बाळ जागे असतांना तीही जागी रहात असे. काही वेळा मला झोप लागत असे आणि त्या वेळेत बाळ दूध पिण्यासाठी कुरकुर करत असेल, तर प्रज्ञा मला ‘ताई ताई.. बाळ ..’ असे म्हणून उठवत असे. प्रत्यक्षात तिला लहान मुलांप्रमाणेच थोडेसे आणि मोजकेच शब्द बोलता येतात.’
कु. प्रज्ञामध्ये अलीकडे जाणवलेले पालट
१. ‘प्रज्ञाच्या तोंडवळ्यावर पहिल्यापेक्षा आनंद जाणवतो. ती सतत हसत असते. तिचे मला आणि आई-बाबा यांना प्रेमाने हाक मारणे अन् प्रेमाने जवळ घेणे वाढले आहे.’ – श्री. सनातन (देवेंद्र) हेम्बाडे (लहान भाऊ), जळगाव
२. ‘पूर्वी तिच्याकडे पाहिल्यावर ‘तिच्यावर पुष्कळ आवरण आहे’, असे वाटायचे. ‘आता आवरण अल्प झाले आहे’, असे वाटते.’ – सौ. अक्षरा शिंदे (मोठी बहीण), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
३. ‘पूर्वी प्रज्ञा तिची झोपायची जागा किंवा तिला पाहिजे असलेली वस्तू कधीही कोणाला देत नव्हती; पण आता तिचे त्याकडे लक्ष नसते. आता वस्तू, जागा इत्यादींमध्ये अडकण्याचे तिचे प्रमाण उणावले आहे.’ – सौ. शोभा हेम्बाडे (आई)
(सर्व सूत्रांचा दिनांक २०.८.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |