दैवी सुगंधाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले सतत समवेत असल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी वर्ष २००६ पासून म्हणजे मागील १२ वर्षांपासून रामनाथी आश्रमात सेवेसाठी राहिले आहे. मी वर्षातून न्यूनतम २ वेळा आणि वैयक्तिक कामे असल्यास अन्य वेळी घरी जाते. आमच्या घरी पूर्वज, तसेच अनिष्ट शक्ती यांचे तीव्र स्वरूपात त्रास आहेत. आईविना घरातील सर्वच सदस्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे घरात नेहमी भांडणे, वादविवाद, मारामारी असे त्रास होत असतात आणि घरातील वातावरण अधिकांश वेळा त्रासदायक असते. आता घरातील या तीव्र त्रासाचे प्रमाण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने उणावले आहे, तरीही काही वेळा एकदम त्यात वाढ होते. या कठीण प्रसंगांत माझ्या प्रत्येक वस्तूला दैवी सुगंध येतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवी सुगंधाच्या माध्यमातून सतत समवेत राहून आमचे रक्षण केले आहे. त्याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. आश्रमातून नेलेल्या ‘बॅगे’ला सुगंध येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले सुगंधाच्या रूपाने येत असल्याची आणि घरातील त्रास न्यून करून घरातील सदस्यांना तीव्र प्रारब्ध भोगण्यास बळ देत असल्याची अनुभूती : मी आश्रमातून घरी गेल्यावर माझ्या समवेत नेलेल्या ‘बॅगे’तील प्रत्येक वस्तू आणि कपडे यांना विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. ‘कपडे धुतल्यानंतरही हा सुगंध टिकून रहातो’, असे अनुभवायला येते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सुगंधाच्या रूपाने माझ्या समवेत येतात. ते घरातील त्रास न्यून करून घरातील सदस्यांना तीव्र प्रारब्ध भोगण्यासाठी बळ देतात. आम्हाला काही प्रमाणात आनंदही होतो’, अशी अनुभूती मी आणि आई सातत्याने घेत आहोत. आता तर बाबांनाही ‘ती अनुभूती आहे’, याची निश्चिती पटली आहे. माझी बहीण आणि काही स्थानिक साधक यांनीही ही अनुभूती घेतली आहे.

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

२. सुगंधासह होत असलेला आनंद टिकून रहाण्याचा कालावधी वाढल्याचे जाणवणे : मी समवेत नेलेली ‘बॅग’ उघडली की, त्यातून घरात सुगंध दरवळतो. या ३ – ४ मासांत सुगंधामुळे होत असलेला आनंद टिकून रहाण्याचा कालावधी वाढल्याचे आम्हाला जाणवत आहे. ‘हा सुगंध चैतन्यस्वरूप आहे’, असे अनुभवायला येते. आम्हा चौघांना (माझे आई-वडील, बहीण आणि मी) हा सुगंध वेगवेगळा येतो. आम्हाला कधी कुंकू, कधी चंदन यांचा, तर कधी रामनाथी आश्रमात येतो, तसा दिव्य सुगंध येतो. काही वेळा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा सुगंध येतो. ‘बॅग’ तीच असते, परंतु सुगंध वेगवेगळा असतो.

४. सुगंधरूपी दैवी शक्ती, वास्तू आणि घरातील सदस्य यांचे त्रासदायक शक्तींशी सूक्ष्म युद्ध होणे आणि घरातील त्रास उणावत असल्याचे लक्षात येणे : मागील १२ वर्षांत या सुगंधाविषयी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. आश्रमातून नेलेल्या ‘बॅगे’तील सुगंधरूपी दैवी शक्तीशी वास्तू आणि घरातील सदस्य यांमधील त्रासदायक शक्तींचे सूक्ष्म युद्ध होते. पहिले २ – ३ वर्षे त्रासाचे प्रमाण अधिक असल्याने हा सुगंध काही दिवसांत नाहीसा व्हायचा; परंतु नंतर मी रामनाथी आश्रमात येईपर्यंत सुगंध येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ‘मी घरी गेल्यावर प्रथम सूक्ष्म युद्ध आणि नंतर घरातील सदस्यांना आनंद मिळणे’, असे होऊ लागले. या वर्षी मी वैयक्तिक कामानिमित्त ३ – ४ वेळा घरी गेले. तेव्हा मी रामनाथी आश्रमात परत येईपर्यंत सुगंध टिकून होता. तेव्हा ‘घरातील त्रास उणावत आहे’, असे लक्षात आले.

५. ‘सुगंधाच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येत असून ते घरातील प्रत्येक सदस्याच्या समवेत असल्याचे आणि घरच्यांना खडतर प्रारब्ध भोगण्यास बळ देऊन त्यांचा त्रास न्यून करत आहेत’, असे जाणवणे : एप्रिल २०१८ मध्ये आईची ‘पर्स’, तसेच कपाटातील खण यांनाही मंद प्रमाणात सुगंध येत असल्याचे लक्षात आले. मध्यंतरी बहिणीने तिची कुलदेवी ज्या डबीत ठेवली होती, त्या डबीलाही सुगंध येऊ लागला. हा सुगंध म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्यक्ष घरी येत असल्याचे आणि ते सतत मी, आई आणि घरातील प्रत्येक सदस्य यांच्या समवेत असल्याचे द्योतक आहे. ‘ते घरच्यांना खडतर प्रारब्ध भोगण्यास बळ देतात आणि त्यांचा त्रास न्यून करतात’, असे मला आणि आईला तीव्रतेने वाटते. सुगंध घेतल्यावर आम्हाला आनंद होतो. आम्हाला आनंद झाल्याने हलकेपणा जाणवतो; परंतु घरी त्रासाचे प्रमाण अधिक असल्याने हा आनंद टिकून रहाण्याचा कालावधी अल्प असतो.

६. रुग्णालयातील खोलीत, शस्त्रकर्मगृहात आणि नंतर संपूर्ण रुग्णालयात सुगंध येणे आणि रुग्णालयातून घरी गेल्यावरही दीड दिवस सुगंध येणे : नोव्हेंबर २००८ मध्ये मी घरी गेले असतांना माझे एका व्याधीसंदर्भात शस्त्रकर्म होते. त्या वेळी मी रुग्णालयात असतांना माझ्या खोलीत, शस्त्रकर्मगृहात आणि नंतर संपूर्ण रुग्णालयात हा सुगंध येत होता. हा सुगंध तेथील उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांनाही आला. तेव्हा त्यांनी साधनेविषयी जाणून घेतले आणि उपचाराच्या देयकाची ७५ टक्के रक्कम न्यून करून माझ्या आग्रहामुळे केवळ नाममात्र पैसे घेतले. ‘मी रुग्णालयातून घरी गेल्यावरही तेथे दीड दिवस सुगंधाची अनुभूती येत होती’, असे त्यांनी पुनर्तपासणीच्या वेळी सांगितले.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले देहरूपाने घरात आल्याचे जाणवणे आणि घरामध्ये विविध दैवी कण आढळून चैतन्य अनुभवणे : वर्ष २०११ मध्ये पाठदुखीच्या त्रासामुळे मी साधारण ७ – ८ मास घरी होते. त्या वेळी माझे साहित्य ठेवलेल्या कपाटाला आणि त्यातील प्रत्येक खणाला सुगंध येत होता. तेव्हा मला आनंद होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून घरी आल्याचे जाणवले. एकदा तर काही कारण नसतांना घरात विविध रंगांचे दैवी कण आढळले. आम्हाला घरात चैतन्य अनुभवायला आले.

८. एका संतांच्या सत्संगात देवाने पेशीपेशीत सुगंध भरून सुगंधमय केल्याचे जाणवणे आणि सत्संगानंतर ३ दिवस तोंडात गोड चव असणे : मार्च २०१८ मध्ये भावसत्संग झाला. आमची एका संतांची भेट झाली. त्या वेळी संपूर्ण सत्संगात ‘माझ्या देहात नाका-तोंडावाटे सुगंध जात आहे’, अशी मला अनुभूती आली. ‘तो सुगंध मी भोजन केल्याप्रमाणे ग्रहण करत आहे’, असे मला अनुभवायला आले. जेवल्यानंतर पोट भरते, तसे सत्संगाच्या शेवटी मला जाणवले. ‘या वेळी देवाने माझ्या पेशीपेशीत सुगंध भरून मलाच सुगंधमय केले आहे’, अशी अनुभूती मला आली. सत्संगानंतर ३ दिवस माझ्या तोंडात गोड चव होती.

९. अनिष्ट शक्तींशी तीव्र स्वरूपाचे सूक्ष्म युद्ध होऊन परात्पर गुरु डॉक्टर आठवले, संत आणि सद्गुरु यांच्या सत्संगाने त्रासातून बाहेर पडता येणे

९ अ. सुगंधी दैवी शक्ती आणि वास्तू, तसेच घरातील सदस्य यांमध्ये अनिष्ट शक्तीचे तीव्र स्वरूपाचे सूक्ष्म युद्ध होऊन घरात मारामारी, वस्तूंची तोडफोड होणे : एप्रिल २०१८ मध्ये घरी गेल्यावर ‘बॅग’ उघडल्यावर घरातील सर्व सदस्यांना चैतन्याची अनुभूती आली. दुसर्‍या दिवशी माझ्या बहिणीला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. तेव्हा हा सुगंधरूपी चैतन्य आणि दैवी शक्ती यांचा परिणाम असल्याचे लक्षात आले. या वेळी सुगंधी दैवी शक्ती आणि वास्तू, तसेच घरातील सदस्य यांमधील अनिष्ट शक्तीचे सूक्ष्म युद्ध तीव्र स्वरूपाचे होते.

९ आ. संत आणि सद्गुरु यांचा सत्संग मिळाल्याने घरातील सर्व सदस्य जिवंत राहू शकणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सूक्ष्मातून २ वेळा घरी आल्या आहेत’, अशी अनुभूती मला आणि आईला आली. एकदा घरी सूक्ष्मातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आल्या. याच कालावधीत स्थुलातून सद्गुरु नंदकुमार जाधव जिल्ह्यात आले असल्याने त्यांचाही आम्हाला सत्संग लाभला. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वत:हून संपर्क करून आमची विचारपूस केली आणि आम्हाला बळ दिले. स्थानिक संत पू. शिवनगिरीकर महाराज यांचाही आम्हाला सत्संग लाभला. या संतांच्या सत्संगामुळे झालेल्या त्रासात आम्ही घरातील सर्व सदस्य जिवंत राहू शकलो. आम्ही त्या त्रासातून बाहेर पडलो. तेव्हा ‘संतांचा सत्संग आणि साधना नसती, तर आम्ही केव्हाच मृत झालो असतो’, याची आम्हाला तीव्रतेने जाणीव झाली.

९ इ. स्थुलातून कोणतेही कारण नसतांना श्वासासह दैवी सुगंध येऊन बळ मिळणे : या कालावधीत संतांच्या स्थुलातून आणि सूक्ष्मातून मिळालेल्या सत्संगानंतर जेव्हा मन स्थिर होत असे, तेव्हा ‘स्थुलातून कोणतेही कारण नसतांना श्वासासह दैवी सुगंध येऊन बळ मिळत आहे’, अशी मला ७ – ८ वेळा अनुभूती आली. यामुळे मला आनंद होत असे. हा आनंद भावसत्संगात लाभलेल्या आनंदाप्रमाणेच होता. तेव्हा ‘प्रत्येक क्षणी सुगंधरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, यासाठी कृतज्ञता व्यक्त झाली.

९ ई. पू. शिवनगिरीकर महाराज यांना भेटल्यावर सुगंध येणे : असाच सुगंध मार्च २०१७ मध्ये मी जेव्हा पू. शिवनगिरीकर महाराज यांना भेटले होते, तेव्हाही आला होता. पू. शिवनगिरीकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी नवनाथांचा दोरा आणि विभूती दिली, त्या वेळीही सुगंध आला आणि हा सुगंध रामनाथी आश्रमात येईपर्यंत टिकून होता.

एप्रिल २०१८ मध्ये घरी गेल्यावर एकदा मी स्थानिक नवनाथांची उपासना होत असलेल्या मंदिरात गेले होते. तेव्हा नवनाथ उपासक संत पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या पत्नी माझ्या समवेत होत्या. त्यांनी मधेच मला विचारले, ‘‘तू काही गंधस्वरूप लावले आहे का ?’’ मी ‘नाही’ म्हटल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘असा सुगंध आमच्या घरीही आला होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्या (पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या) मुलीच्या लग्नानिमित्त आशीर्वाद देणारे पत्र पाठवले होते. ते पत्र पू. महाराज स्वीकारतांना असाच सुगंध आला होता, तसेच पू. महाराजांनी जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी भेटवस्तू दिली, तेव्हा ती भेटवस्तू देतांनाही असाच सुगंध आला होता. आमच्या घरातील पाहुण्यांनाही तो सुगंध आला आणि जवळपास एक ते दीड घंटे हा सुगंध घरात येत होता.’’ त्यांची अनुभूती ऐकल्यावर माझी भावजागृती झाली.

१०. कृतज्ञता आणि प्रार्थना : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव घेताच हा सुगंध कार्यरत होतो’, असे वरील अनुभूतींद्वारे प्रत्यक्ष आणि अन्य वेळी रामनाथी आश्रमात असतांनाही मी अनेक वेळा अनुभवले आहे. ‘हा सुगंध म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, याची अनुभूती अनेक वेळा परमेश्वराने दिली. हे गुरुराया, याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘तुला अपेक्षित असा कृतज्ञताभाव माझ्यामध्ये अखंड रहावा’, यासाठी तूच कृपा कर.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०१८)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक