१. सनातन संस्थेच्या सत्संगात सांगितल्याप्रमाणे कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप चालू करणे
‘साधनेत येण्यापूर्वी ताई (श्रीमती सुमती सरोदे) महात्मा गांधी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. तिच्या समवेत तिची मैत्रीण सौ. मंदाकिनी डगवार (आताच्या श्रीमती मंदाकिनी डगवार, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) याही त्याच शाळेत शिक्षिका होत्या. एके दिवशी त्या दोघी शाळा सुटल्यावर घरी येत होत्या. तेव्हा वाटेत एका साधिकेने त्यांना सांगितले, ‘‘आज सनातनचा सत्संग आहे. तुम्ही या.’’ त्या वेळी ताईने विचारले, ‘‘सत्संगात काय सांगतात ?’’ तेव्हा त्या साधिकेने सांगितले, ‘‘सत्संगात कुलदेवतेविषयी सांगतात.’’
ताईला आणि सौ. मंदाकिनी डगवार यांना कुलदेवतेविषयी जाणून घ्यायचे होते; म्हणून त्या दोघीही सत्संगाला गेल्या. त्यांना पहिल्या सत्संगातच कुलदेवता आणि दत्त यांच्या नामाचे महत्त्व सांगण्यात आले. त्यांना ते पटले आणि त्यांनी ते लगेच कृतीत आणले. नंतर त्या प्रत्येक सप्ताहात सत्संगात जाऊ लागल्या. तो सत्संग प्रत्येक शनिवारी वर्धा येथील केंद्रात असायचा.
२. ‘इतरांना सत्संग आणि सेवा मिळावी’, यासाठीची तळमळ
ताईला सत्संगाचे महत्त्व कळले; म्हणून ती ‘आम्हाला (मला, यजमानांना आणि सासूबाईंना) तो सत्संग कसा मिळेल ?’, यासाठी प्रयत्न करत होती. तेव्हा मी ताईला म्हणायचे, ‘‘मी सत्संगाला जाईन’’ आणि कधीच गेले नाही. ताईच्या हे लक्षात आले. मग तिने तिच्याच घरी सत्संग चालू केला आणि आम्हाला घरी बोलावले. तिने घरून येतांना समवेत सतरंजी, फळा आणि खडू आणण्यास सांगितले. यामागे ‘आम्हाला सेवेची संधी मिळावी’, असा तिचा उद्देश होता.
३. त्यागी वृत्ती
ती महागडे कपडे विकत घेत नसे. ‘काटकसर करून शिल्लक राहिलेले पैसे अर्पण कसे करता येतील ?’, याकडे तिचे लक्ष असायचे.
४. नातेवाइकांकडून साधना करवून घेणे
तिने आरंभी नातेवाइकांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवले होते. त्यांच्याकडून ती गुरुपौर्णिमेचे अर्पण घेत असे. तिला नातेवाइकांकडून अर्पण घेतांना कधीच संकोच वाटला नाही. ती त्यांना साधनेचे महत्त्व सांगत असे.
५. प्रत्येक कृती शास्त्राप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणे
ताई सत्संगात आणि परात्पर गुरुदेवांनी ग्रंथात सांगितलेले शास्त्र कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. तिला सात्त्विक कपडे आणि वस्तू घ्यायला आवडतात.
६. जाणवलेला पालट – इतरांना साहाय्य करणे
आरंभी ताईचा इतरांना साहाय्य करण्याचा भाग अल्प होता; पण आता तो वाढला आहे.
-सौ. विजया भोळे (भावजय), वर्धा (२६.९.२०१८)