१. सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे चीन किंवा पाकिस्तान असल्यास त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !
‘भारताची प्रगती होऊ नये, तो आर्थिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत व्हावा’, असे देशाच्या शत्रूंना नेहमीच वाटते. वर्ष २०२० मध्ये तैवानच्या सैन्यदलप्रमुखांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात कदाचित् चीनने सुनियोजित केला होता; कारण चीन हा तैवान आणि भारत यांचा सामायिक शत्रू आहे. चीन आज भारताच्या विरोधात अप्रत्यक्ष युद्ध लढत आहे. त्यालाच ‘हायब्रिड वॉर’ म्हटले जाते. या माध्यमातून चीन विविध प्रकारच्या कारवाया करून भारताची प्रगती थांबवू इच्छित आहे. १२ ऑक्टोबर २०२१ या दिवशी मुंबईच्या वीजप्रणालीवर सायबर आक्रमण (संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करून करण्यात येणारे आक्रमण) करण्यात आल्यामुळे ती अचानक बंद पडली होती आणि अनेक घंटे मुंबई अंधारात होती. चीन काहीही करू शकतो. त्यामुळे सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे अन्वेषण झाले पाहिजे, तसेच हे कृत्य चीन किंवा पाकिस्तान यांनी केले असल्यास त्यांच्यावरही ‘जशास तसे’ पद्धतीने कारवाई झाली पाहिजे.
२. सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत देशांतर्गत आणि देशाबाहेरील शत्रूंशी शक्तीनिशी लढणे !
सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत हे सर्वगुणसंपन्न अधिकारी होते. ते सैन्यप्रमुख असतांना डोकलामचा संघर्ष उद्भवला होता. त्या वेळी भारतीय सैन्याने चिनी सैन्याला मागे ढकलले होते. जेव्हा ते इस्टर्न आर्मी कमांडर होते, तेव्हा भारताच्या डोगरा बटालियनवर नागा बंडखोरांनी आक्रमण केले होते. त्यानंतर प्रथमच भारतीय सैन्याने म्यानमारच्या हद्दीत जाऊन ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल ऑफ नागालँड’च्या प्रशिक्षण शिबिरांवर आक्रमण केले. या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संपूर्ण नियोजन आणि त्याची कार्यवाही जनरल रावत यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. उरीमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय सैन्यावर आक्रमण केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. त्याचेही नियोजन जनरल रावत यांनीच केले होते.
जनरल बिपीन रावत हे अतिशय आक्रमक आणि लढाऊ अधिकारी होते. अनेक वेळा तथाकथित मानवाधिकार कार्यकर्ते आणि तज्ञ भारतीय सैन्याला शिव्या देण्यात धन्यता मानतात. सैन्याची हानी झाली, तर त्यांना आनंद होतो. या लोकांनी जनरल रावत यांच्या मृत्यूवर उत्सव साजरा केला. अशांना जनरल रावत कधीच घाबरले नाहीत. त्यांनी त्यांना ‘जशास तसे’ उत्तर दिले आणि गप्प केले. जनरल रावत यांनी नेहमी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अशीच कारवाई केली. अशा प्रकारचे मानवाधिकार कार्यकर्ते, देशांतर्गत शत्रू आणि बाहेरचे शत्रू यांच्या विरोधात ते शक्तीनिशी लढले.
आज चीनशी कोणतीही चर्चा करतांना सरकार मागे-पुढे पहाते. चिनी विषाणू (कोरोना) चीनमधून आला आहे. त्याविषयी आपण बोलायलाही सिद्ध नाही. जनरल रावत यांनी भारताचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी म्हटल्याप्रमाणे ‘चीन हा भारताचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे’, असे ठणकावून सांगितले होते. चीन अडथळा आणणार्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे. चीन भारतावर सायबर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो. याविरोधात जनरल रावत केवळ बोलले नाही, तर त्यांनी कारवाईही केली. अशा पद्धतीने जनरल रावत यांनी देशाच्या सुरक्षेमध्ये ४० वर्षांपासून मोठे योगदान दिले.
३. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना भावनात्मक पाठिंबा देणे, हे आपले सामाजिक दायित्व !
जनरल रावत यांची पत्नी मधुलिका रावत यांनी सैनिकांच्या कल्याणाच्या योजनांमध्ये मोठा हातभार लावला. आता जनरल रावत यांच्यामागे केवळ त्यांच्या २ तरुण मुली आहेत. ज्यांना त्यांचे जीवन आई-वडील यांच्याविना काढावे लागेल. या अपघातामध्ये जनरल रावत यांच्याखेरीज ब्रिगेडियर लखबिंदर सिंह लिड्डर यांचा मृत्यू झाला. ते एक चांगले अधिकारी होते. त्यांना मेजर जनरल म्हणून पदोन्नती मिळणार होती. त्यांनीही काश्मीर खोर्यात सैन्याचे नेतृत्व करून चांगला पराक्रम केला होता. त्यानंतर त्यांना कझाकिस्तान येथे पाठवण्यात आले होते. यासमवेत या दुर्घटनेमध्ये हुतात्मा झालेले विविध रँकचे अन्य १२ सैनिक होते. त्यांच्या कुटुंबांचीही पुष्कळ हानी झाली. त्यामुळे एक समाज म्हणून अशा प्रकारे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना भावनात्मक पाठिंबा देणे, हे आपले दायित्व आहे.
४. सैनिकांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आनंद व्यक्त करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक !
जेव्हा विरांचे पार्थिव तमिळनाडूतील ‘स्टाफ कॉलेज वेलिंग्टन’मधून निघाले, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा शेकडो लोक उभे होते आणि त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत होते. देशात विविध ठिकाणी सैनिकांचे अंत्यसंस्कार झाले, तेथेही मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. हे देशभक्तीचे वातावरण आहे. याच वेळी सामाजिक माध्यमांवर काही लोक आनंदोत्सव साजरा करत होते. त्यांच्यात काही तथाकथित वलयांकित लोकांचाही समावेश आहेत, जे नेहमी देशाविषयी वाईट विचार करतात. अशा लोकांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. हे लोक पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करतात, चीनच्या चांगल्या गोष्टीविषयी आनंद व्यक्त करतात आणि भारताचे वाईट झाले, तर आनंदोत्सव साजरा करतात. अशा शत्रूंच्या विरोधातच जनरल रावत आणि भारतीय सैन्य यांना नेहमी लढावे लागले.
५. संरक्षण क्षेत्रात देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे जनरल रावत यांचे स्वप्न साकार करूया !
सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सैन्यदलामध्ये आमूलाग्र पालट करून त्याला अत्याधुनिक करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातील ‘थिएटर कमांड’ (एकत्रित नेतृत्व करण्याचे काम) हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारतात ७० वर्षांनी हे एक मोठे पाऊल उचलण्यात आले. भूदल, नौदल आणि वायूदल एकत्रित नेतृत्वाखाली काम करेल, त्याला ‘थिएटर कमांड’ म्हटले जाते. आज भूदल, नौदल आणि वायूदल मिळून १७ कमांड आहेत; परंतु आता केवळ ५ कमांड असणार आहेत. त्या अंतर्गत सर्वांना एकत्र आणण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील साधनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर होईल. याला १-२ वर्षे लागतील.
देशाचे आधुनिकीकरण होत आहे. विशेषत: देशात बनलेल्या शस्त्रास्त्रांसह ‘आत्मनिर्भर भारत’ हा सैन्यासाठी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. भारतीय शस्त्रे अमेरिका, रशिया किंवा फ्रान्स यांच्या शस्त्रांएवढी अत्याधुनिक नसतील; पण ती भारतीय असणार आहेत. देशाने आत्मनिर्भर होण्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे. या संकल्पनेला जनरल रावत यांनी चालना दिली होती. त्यांचे योगदान कुणीही विसरणार नाही. त्यांचे राहिलेले काम त्यांच्या नंतर येणारे सैन्यदलप्रमुख निश्चितपणे करतील !
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे