भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण

भाजप आमदार नितेश राणे (उजवीकडे)

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उपाख्य गोट्या सावंत यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने त्यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ३० डिसेंबरला या अर्जावर निकाल देतांना न्यायालयाने आमदार राणे आणि सावंत या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे आमदार राणे आणि सावंत यांना अटक टाळण्यासाठी आता उच्च न्यायालयात अर्ज करणे किंवा पोलिसांसमोर उपस्थित रहाणे, हे दोनच पर्याय शिल्लक राहिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे.

१८ डिसेंबरला कणकवली येथे संतोष परब यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले होते. या प्रकरणी आमदार राणे आणि गोट्या सावंत यांच्या जामीनअर्जावर २८ आणि २९ डिसेंबर असे दोन दिवस सुनावणी झाली; मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. ३० डिसेंबरला न्यायालयाने यावर निकाल देतांना अटकपूर्व जामीन फेटाळला.